दोन्ही खासदारांना खाण भागांत प्रचार करू देणार नाही ः ट्रकमालकांचा इशारा

0
131

गोव्यात बंद झालेल्या खाणी सुरु करण्याची आश्वासने भाजप नेत्यांकडून मिळत असली तरी केंद्रात तसेच राज्यात भाजपचे सरकार असूनसुद्धा प्रत्यक्षात मात्र सरकारने काहीच हालचाली केलेल्या दिसून येत नाहीत. त्यामुळे खाण अवलंबितांनी संघटित राहणे गरजेचे असून ट्रक, बार्ज, मशीन मालकसह व कामगार संघटनांची नवीन समितीची स्थापन करण्यात येत आहे. मात्र येणार्‍या लोकसभा निवडणुकीत यापूर्वी आश्‍वासन दिलेल्या दोन्ही खासदारांना खाणभागात प्रचार करू देणार नसल्याचा इशारा अखिल गोवा ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस यांनी दिला आहे.

तिस्क उसगाव येथे झालेल्या बैठकीत कामगार नेते पुती गावकर, बालाजी उर्फ विनायक गावस, संदीप परब, शिवदास माडकर, सुरेश देसाई, शशिकांत गावकर व अन्य उपस्थित होते.
भाजप सरकारने राजकारण करून गोव्याच्या खाणी बंद केल्या त्याचा फटका ट्रक, बार्ज, मशीन मालक व कामगारांना बसला आहे. परंतु भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीत खाणी सुरू करण्याची आश्‍वासने देऊन खाणग्रस्तांची दिशाभूल केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकी पूर्वी खाणी सुरू न झाल्यास भाजपच्या उमेदवारांना प्रचार करू देणार नसल्याचे नीलकंठ गावस यांनी सांगितले.

कामगार नेते पुती गावकर म्हणाले, की मंत्री सुदिन ढवळीकर व विजय सरदेसाई यांनी ३१ मे पर्यंत खाणीचा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र खाणग्रस्तांचे प्रश्‍न अजून प्रलंबित असल्याचे दिसून येत असून नवीन स्थापन केलेल्या समितीतर्फे जूनपासून सरकार विरोधात शांततापूर्ण लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. समितीत ५० जणांचा समावेश असून समिती तर्फे घेण्यात येणार निर्णय अंतिम असणार आहे. मात्र समितीच्या कोणत्याही एका पदाधिकार्‍याला निर्णय घेण्याचा अधिकार नसणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
येत्या १० दिवसात खाण भागातील प्रत्येक गावात कोपरा बैठका घेऊन स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे.