फेरीबोटीतील वाहन शुल्काबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय

0
4

मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

नदी परिवहन खात्याने फेरीबोटीतील वाहनांसाठी जाहीर केलेल्या शुल्काबाबत नागरिकांची मते विचारात घेतली जाणार आहेत. तसेच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नदी परिवहन खात्याने राज्यातील 18 जलमार्गावरील फेरीसेवेसाठी दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व अवजड वाहनांसाठी नवीन दर जाहीर केले आहेत. फेरीबोटीमध्ये दुचाकी वाहनांना मोफत प्रवेश दिला जात होता. तर, चारचाकी वाहनांसाठी 10 रुपये आकारले जात होते. नवीन दरपत्रकामुळे फेरीबोटीचा नियमित वापर करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. कुंभारजुव्याचे आमदार राजेश फळदेसाई यांनी फेरीबोटीमध्ये दुचाकी वाहनांसाठी शुल्क तसेच चारचाकी वाहनासाठी वाढविण्यात आलेल्या शुल्काबाबत नाराजी व्यक्त केली
आहे. नदी परिवहन खात्याची फेरीबोट सेवा तोट्यात सुरू असल्याने महसूल निर्मितीसाठी नवीन शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही शुल्क वाढ करताना नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी पास पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेरीबोट शुल्काबाबत नागरिकांची मते विचारात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

जाहीर केलेले दर
राज्य सरकारने एका सूचनेद्वारे फेरीबोटीतून दुचाकी, तीन व चारचाकी, कार्गो आणि प्रवासी वाहनांसाठी दर जाहीर करण्यात आले आहेत. राज्यातील 18 मार्गावरील फेरीबोट प्रवासासाठी हे दर आहेत. दुचाकीसाठी ः 10 रुपये, मासिकपास 150 रुपये, तीन आणि चारचाकी ः 40 रुपये व मासिक पास 600 रुपये, प्रवासी वाहन ः 100 रुपये, मासिक पास 1,500 रुपये, अवजड वाहने ः 400 रुपये, मासिक पास 6,000 रुपये, कार्गोसाठी ः पन्नास रुपये प्रतिटन.