फुटीरांविरुद्ध कॉंग्रेसकडून ३ महिन्यांनंतर याचिका

0
9

>> प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडून कॉंग्रेसतर्फे अधिकृतरित्या अपात्रता याचिका सादर; पक्षफुटीच्या दाव्याला आव्हान

गेल्या सप्टेंबर महिन्यात कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ८ आमदारांविरुद्ध काल अखेर कॉंग्रेस पक्षाने अधिकृतरित्या अपात्रता याचिका दाखल केली. जवळपास तीन महिने उलटून गेल्यानंतर आता पक्षाच्या वतीने गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

गेल्या १४ सप्टेंबर रोजी कॉंग्रेस पक्षाच्या ११ आमदारांपैकी ८ आमदार पक्षातून फुटून त्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी जुलै महिन्यात देखील पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर कॉंग्रेसच्या काही आमदारांनी पक्षांतराचा प्रयत्न केला होता; मात्र आवश्यक संख्येची जुळवाजुळव न झाल्याने तो प्रयत्न फसला होता. दुसर्‍या प्रयत्नात मात्र त्यांनी डाव साधला. या राजकीय भूकंपानंतर राज्याच्या राजकारणासह देशात मोठी खळबळ माजली होती.

याच ८ फुटीर आमदारांविरुद्ध सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर यापूर्वीच दोन अपात्रता याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एक याचिका ही गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी, तर दुसरी याचिका ही पक्षाचे नेते डॉम्निक नोरोन्हा यांनी सादर केलेली आहे.
आता कॉंग्रेसतर्फे ज्यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यात आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस, डिलायला लोबो व आलेक्स सिक्वेरा यांचा समावेश आहे.

त्याशिवाय अमित पाटकर यांनी पक्षविरोधी कारवाया करत असल्याच्या कारणास्तव दिगंबर कामत व मायकल लोबो यांच्याविरोधात आणखी एक वेगळी अपात्रता याचिका यापूर्वीच दाखल केलेली आहे.

ऍड. कार्लूस फेरेरा कॉंग्रेसची बाजू मांडणार

या याचिकेवरील सुनावणीवेळा पक्षाच्यावतीने हळदोणा मतदारसंघाचे आमदार तथा कॉंग्रेस नेते ऍड. कार्लूस फेरेरा हे वकील या नात्याने बाजू मांडणार असल्याचे पक्षाने काल स्पष्ट केले आहे. विधिमंडळ पक्षात दोन तृतीयांश एवढी फूट पडणे म्हणजेच पक्षात फूट पडणे होय असा जो दावा करण्यात आलेला आहे,

१० फुटीर आमदारांविरुद्धच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसच्या फुटीर १० आमदारांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी वर्षभर पुढे ढकलण्यात आली आहे. खुद्द चोडणकर यांच्याकडून आव्हान याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. कॉंग्रेसच्या १० आमदारांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याविरोधात गोवा विधानसभेच्या सभापतीसमोर दाखल केलेली अपात्रता याचिका फेटाळण्यात आल्यानंतर चोडणकर यांनी सभापतींच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची गरज नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.