फातोर्ड्यातील हिंदू संमेलनाला २५ हजारांवर उपस्थिती

0
78

फातोर्डा येथे उद्या होणार्‍या हिंदू संमेलनाला २५ हजारांवर लोक उपस्थित राहणार असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीनिवास वासुदेव धेंपे यानी काल पत्रकार परिषदेत सांगितले.विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. या संमेलनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अदृश्य काडसिध्देश्‍वर स्वामी, पुष्पराज स्वामी, मुकुंदबुवा मडगांवकर, कीर्तनकार बाळमहाराज, स्वामी विज्ञानंद, सौ. मंगलाताई कांबळे, अशोकराव चौगुले, ऍड. दीपक गायकवाड, प्रा. सुभाष वेलिंगकर आदी मान्यवर हजर राहणार असल्याचे धेंपे यांनी सांगितले.
संमेलनात विश्व हिंदू परिषदेने गेल्या ५० वर्षांत केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात येईल. तसेच पुढील ५० वर्षांच्या काळात विहिंपची वाटचाल काय असेल त्यावर मंथन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विहिंपने गोव्यात उभारलेल्या प्रकल्पांविषयी माहिती देताना ते म्हणाले की राज्यात अनाथ मुलींसाठी ‘मातृछाया’ ही संस्था सुरू केली. बांबोेळी येथे रुग्णांसाठी रुग्णाश्रम उभारले आहे. आसगांव येथे महिला आश्रम व वृध्दाश्रम व बालविकास केंद्र सुरू केले आहे.
दरम्यान, विहिंप राज्यात धर्मांतराचे काम हाती घेऊ पाहत आहे त्याविषयी तुमचे म्हणणे काय आहे, असे पत्रकारांनी धेंपे याना विचारले असता ते म्हणाले की आपण फक्त संमेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्याने काम पाहत आहे. आपण विहिंपचा सदस्यही नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.