तामिळनाडूमध्ये एका फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागून त्यात ११ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या दुर्घटनेत २४ जण जखमी झाले आहेत. जखणींवर सरकारी इस्पितळात उपचार चालू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवळपास ३० गाड्या दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, फटाक्यांच्या कारखान्यात आतमध्ये वारंवार स्फोट होत होते व आगही भडकत होती. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना आत प्रवेश करणे कठीण झाले होते. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या आगीत फटाके बनवणारे जवळपास चार मोठे शेड नष्ट झाले आहेत.
या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले असून या दुर्दैवी क्षणाला पीडितांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी झालेले लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत पुरवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असल्याचे ट्विट केले. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबांना २ लाखांची तर जखमींना ५० हजारांची मदत पुरवण्यात येईल, असे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, या घटनेवर राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त केले आहे.