प्लॅस्टिकपासून रेतीच्या संशोधनास आजपासून गोव्यात प्रारंभ

0
67

मये तंत्रनिकेतनचे ४० विद्यार्थी काम करणार
गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या (जीसीसीआय) समाजसेवा विभाग व मये येथील तंत्रनिकेतनने ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ बाथ’ च्या सहकार्याने प्लास्टिकपासून रेती बनविण्याच्या प्रकल्पावर संशोधन करण्याचे ठरविले असून आजपासून त्याविषयीच्या संशोधनास प्रारंभ होईल, अशी माहिती मांगिरीश पै रायकर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य सुभाष बोरकर, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. पूर्णानंद सावईकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
सध्या रेतीवर बंदी आहे. त्याचा बांधकामावर परिणाम होतो. त्या पार्श्‍वभूमीवर या संशोधन प्रकल्पाला बरेच महत्त्व आहे. प्लास्टिकची भुकटी करून ती कॉंक्रिटमध्ये मिसळली जाईल. ते करताना प्रत्येक टप्प्यावर त्यांची तपासणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
मये येथील सरकारी तंत्रनिकेतनने चार वेगवेगळे प्रकल्प वरील विद्यापीठाला सादर केले होते. विद्यापीठाने प्लास्टिकपासून रेती बनविण्याचा प्रकल्प स्वीकारला. चाळीस विद्यार्थी या प्रकल्पावर काम करणार असून त्यांना वेळोवेळी ब्रिटनला पाठवणार असल्याचे रायकर यांनी सांगितले. या संशोधनाच्या बाबतीत जागृती करणार असून सध्याच्या परिस्थितीत रेतीला पर्याय शोधण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस युनिव्हर्सिटी ऑफ बाथचे डॉ. जॉन ओरे उपस्थित होते.