प्रेषित महंमदाचे व्यंगचित्र छापणार्‍या नियतकालिकावर फ्रान्समध्ये हल्ला

0
101
हल्ल्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी नेताना अग्निशामक दलाचे जवान.

 संपादकासह बारा जणांची हत्या

प्रेषित महंमदाविषयी व्यंगचित्र प्रसिद्ध करणार्‍या एका विनोदविषयक नियतकालिकावर काल अद्ययावत बंदुका आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपकांसह आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी चढवलेल्या हल्ल्यात दहा पत्रकारांसह बारा जण ठार झाले. फ्रान्समधील गेल्या चार दशकांतला हा सर्वांत भीषण हल्ला आहे. हल्ल्यानंतर या हल्लेखोरांनी एक कार थांबवून पलायन केले. जाताना एका पादचार्‍याला धडक देत पोलिसावरही गोळीबार केला.‘चार्ली हेबडो’ नामक एक फ्रेंच विनोदविषयक साप्ताहिकामध्ये यापूर्वी प्रेषित महंमदाविषयी व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्याबद्दलच्या रागाने हा हल्ला चढवण्यात आला असावा असा कयास आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी अल्लाहू अकबरच्या घोषणाही दिल्या.
या हल्ल्यात सदर नियतकालिकाचे मुख्य संपादक व व्यंगचित्रकार स्टीफन चार्बोनियर व त्यांचे संपादकीय सहकारी मारले गेले. त्यांना यापूर्वी जिवानिशी मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या व त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रांकोईस होलंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर हल्ला हा अत्यंत निर्घृण असा दहशतवादी हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्धचा हा घृणास्पद हल्ला असल्याचे ते उद्गारले.
जिलँडस् पोस्टन नामक एका डॅनिश नियतकालिकात प्रसिद्ध झालेले प्रेषित महंमदाचे व्यंगचित्र सदर नियतकालिकाने २००६ साली पुनर्मुद्रित केले होते. त्यानंतर २०११ सालीही या नियतकालिकात प्रेषित महंमदाविषयी व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. तेव्हा सदर नियतकालिकाच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवण्यात आले होेते. त्यानंतर या नियतकालिकावर वर्णद्वेषाचे खटले गुदरण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही या नियतकालिकाने प्रेषित महंमदाविषयी व्यंगचित्रे प्रसिद्ध करणे सुरूच ठेवले होते. सप्टेंबर २०१२ मध्ये ‘इनोसन्स ऑफ मुस्लीम्स’ नामक चित्रपटावरून जगात वाद निर्माण झाला असताना या नियतकालिकाने नग्नावस्थेतील महंमदाचे एक व्यंगचित्र प्रकाशित केले होते.