Home बातम्या प्रा. फ. मुं. शिंदे यांची कविता

प्रा. फ. मुं. शिंदे यांची कविता

0

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

सासवड येथील नियोजित ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ख्यातनाम मराठी कवी, समीक्षक, त्याचप्रमाणे मराठीचे नामवंत प्राध्यापक प्रा. फ. मुं. शिंदे निवडून आले ही आनंददायी घटना आहे. १९७०च्या दशकापासून त्यांनी मराठी काव्यविश्‍वात आपली पृथगात्म मुद्रा उमटविलेली आहे. मनातील सच्च्या अनुभूतीला त्यांनी उद्गार दिलेला आहे. समष्टिमनाचा हुंकारही तेवढ्याच उत्कटतेने ते व्यक्त करतात. तो व्यक्त करीत असताना अकारण निराशावादाला ते स्थान देत नाहीत. त्यांच्या जीवनातील या उत्युत्कट आनंदक्षणी त्यांच्या कवितेचा हा अल्पपरिचय.

‘जुलूस’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला. प्रख्यात विचारवंत आणि समीक्षक दि. के. बेडेकर यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभलेली आहे. या कवीचे स्वागत करताना ते म्हणाले होते ः

‘‘एक तरुण कविमन त्याची व्यथा साकार करते, सच्चेपणाने व सहजतेने करते. काही तरुणांच्या कवितांतून अट्टहासाने येणारा नवखेपणा व प्रदर्शनाच्या आवडीतून येणारा बीभत्सपणा तर येथे नाहीच व दुर्बोधतेचा नखराही नाही. यालाच मी सच्चेपणा म्हणतो आणि म्हणूनच या कवीचे मी स्वागत करतो.’’ या विश्‍वासाला फ. मुं. शिंदे यांच्या काव्यप्रतिभेने कुठेही तडा जाऊ दिला नाही.

क्रमांक ३ च्या कवितेत कवी उद्गारतो :

युगासाठी थांबणार कोण कोणा स्टेशनवर

आम्ही नोमॅडस् वाटेल तिथे पाल देतो.

जंगलात… हिरवळीत. कधी तर स्वतःभोवती

वेष्टून घेतो पालाचे कापड आणि अनुभवतो

जातींची कंगालखोरी वांझेसम

तरीही अपघात घडत नाही आमच्या क्षितिजावर

आम्ही निर्धास्त असतो दुसर्‍या मुक्कामी

पुढचे स्थळ रफू करीत विचारात

आम्ही नोमॅडस्

थांबत नाही युगासाठी

युग नको त्यात काढलेले रंगवून!

कवी युगमानसाची व्यथा आपल्या समर्थ शब्दकळेतून मुखर करतो :

युगाचे साचे बदलत बदलत आले

आकाशाचे सगळेच कॉलम रिकामे राहिले.

इतिहासाच्या रक्त आटलेल्या जुन्या बातम्या

नव्याने शिकतो; ढगांतून रक्त सांडत नाही

सगळी निळाई कोरी कोरी अनुभवून मेली युगे

एक साचा उमटेल त्यावर कधीतरी पुढे मागे-

जीवनात विरूपता असली, विसंगती असली तरी कवीची सकारात्मक अनुभूती नष्ट झालेली नाही याचा प्रत्यय येथे येतो.

प्रीतिभावनेतील अनेक विभ्रम ‘जुलूस’मधील कवितांत आढळतात. क्र. २४च्या कवितेतील प्रियकर उद्गारतो :

म्यानात राहू दे आठवणींना

समर्पणास आहे वेळ अजून

लिहून काढायचेत संवाद रात्रीरात्रीमधले;

उजेडाचे करताना स्वागत तुझ्या नगरीत

आयुष्याचा बळी घे वाटल्यास जुलुसात!

क्र. २७च्या कवितेतील भावनाशय अंतर्मुख करणारा आहे :

तुमच्या रात्रींना केव्हाच आशीर्वाद दिलेत

तुमची स्वप्ने सहीसलामत तीर गाठतील.

आमच्या स्पंदनांना शीर्षके कुठली आलीत

आशय पेलताना तुम्ही डोळ्यांत कैद होता.

या पुढचे सारे अभंग लिहून तुमच्यासाठी

तुमच्या प्रतिमांना चितेसारखी जागा नाही.

‘आदिम’ या कवितासंग्रहातील कविता वैयक्तिक जीवनातील दुःख-व्यथांना वाचा फोडणारी आहे. त्याचप्रमाणे भोवतालच्या भयाण वास्तवावर भाष्य करणारीही आहे. ‘पापुद्रे’ या कवितेत कवी उद्गारतो ः

अटळ अश्रूंनाही

आठवू लागतं मागचं

उदाहरणार्थ आठवणीच

दिशा दुरावतात

क्षितिज हसत नाही

पक्षी पक्षी असत नाही

त्यावेळी

‘तुडुंब’ या कवितेत सामाजिक व्यथांविषयी मानसप्रतिक्रिया व्यक्त करताना तो म्हणतो :

आणि हे सर्व असंच

अफाट यातनांच्या उत्सवात

गढून गेलेले डोंगर जिवंत

मरणोन्मुख ओझ्यात

शिल्पांची स्वप्नं दंशतात आतून

सारं सोललेलं

माणसाचं ढोर

यातनांचा उत्सव

एक एकट्याचा

तुडुंब

‘अदृश्य’ या कवितेतही कवीने असे विदारक चित्र उभे केलेले आहे :

कल्पना अशी आहे

की

उन्हातान्हात

रानावनात

देशाच्या सुबोध चित्रकृतीला

म्हणजेच स्वतःच्या चित्रप्रीतीला

रंगांनी नटवत नेत आहेत

हे गुलाम

कल्पना अशी आहे

की

कोणीच नाहीय गुलाम

पायांना कळवे लावून

काढून घेतलेत लगाम

चरताहेत सर्वत्र घोडे

खडी विखुरलेली खात

‘मीनाकुमारी’ या कवितेत कवी उद्गारतो :

तू एक मीनाकुमारी

माझ्यातील

माझ्या आतील

आतील

इतकी की

तू नसतेसच मीनाकुमारी

कुणी तरी

मीच असतो

वाहिलेला तुला

उर्फ दुःखाला!

फ. मुं. शिंदे यांच्या ‘अवशेष’ या संग्रहात बहुतांश प्रेमकविता आहेत. प्रियकराने प्रेयसीशी केलेल्या हृदयसंवादाची रूपकळा त्याला प्राप्त झालेली आहे. शारीर संवेदनांना त्याने नाकारलेले नाही. ‘समावेश’ या कवितेत प्रियकर म्हणतो :

फक्त तू मी

मावू शकलो परागात

तरी

हे सांगणारच होतो

की

फुलाच्या प्रणयात

पाकळ्या सैल होतात

हेही सांगणारच होतो की

तू मी

अर्थात आपण

म्हणजे फक्त दोघंच नसतो.

‘आणि प्रेयसी’ या कवितेतील प्रियकर उद्गारतो :

सूर्य मावळले

सूर्य उगवले

तू स्वार्थमुक्त

जिवाभावाच्या गोष्टी करताना

क्षितिजासारखी जवळ आणि लांब

तुझ्या युगातून माझ्या युगात

मी उगवतो.

‘फुलराणी’ या कवितेतील प्रियकर म्हणतो :

तिचा फुलदेह फुलासारखा

उमलतो केव्हा

कळलेलं नसतं

हे फुलराणी,

का कोरतेस एक एक अक्षर

कायम

मीही ओलांडतो इथला एक एक

नियम

नामांतराच्या प्रस्तावाच्या निमित्ताने मराठवाड्यात माणसांची होरपळ झाली. माणुसकीला तिलांजली दिली गेली. या जनप्रक्षोभाच्या वेळी जे काही घडले ते ‘स्वातंत्र्य’ या मूल्यसंकल्पनेला काळिमा फासणारे होते याची खंत प्रा. फ. मुं. शिंदे यांना वाटली. या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आपला स्थायी भाव सोडून त्यांना लेखणी वेगळ्या परिभाषेत परजावी लागली. इलाज नव्हता.

आपल्या ‘निवेदन’मध्ये प्रा. फ. मुं. शिंदे म्हणतात :

‘‘दाहकता ‘न्यूड’च्या स्वरूपात उभी असते. तिला सामोरं जाताना मी शरमून गेलो. माझी मला लाज वाटलीच; समाजाचीही कीव आली. जिवंत संवेदनांना अनेकविध अंकुर फुटतात. तेच अंकुर इथं पानाफुलांतून जाणवून देण्याचा प्रयत्न आहे.’’

अंतर्मुख करणारे हे विचार आहेत आणि ‘सार्वमत’ हे काव्यही.

सुरुवातीच्या कवितेत कवी म्हणतो :

हा देश माझा आहे

ते खोटं नाही

दुःखही देशाहून

छोटं नाही

हा देश माणसांचा

हे खरं आहे

कत्तलखाने त्यात

हे बरं आहे.

या उद्गारांतील उपहासात्मकता आपण संवेदनशील मनाने जाणून घ्यायला हवी.

असाच अंतर्मुख करणारा आशय तीव्र शब्दांत कवीने मांडलेला आहे.

मनात काळे मायीच्याही मातीच्याही कसले नाते

इस्तु इंगळ कुर्‍हाडीस फुलविती असले भाते

मित्रांनो

पसरलेले पहाट आपले

भोवतालचा भूभाग आपला

दगड आपले माती आपली

हा प्रदेश हे राष्ट्र

म्हणाल ना आपलेच?

म्हटलंच पाहिजे पाह्यजे आपलंच

म्हणून

असं काय नाही जे आपलं नाही

‘निरंतर’ या कवितासंग्रहातील ‘धृतराष्ट्र’ या कवितेत नियतिनाट्याच्या क्रूरतेचे वर्णन करताना कवी म्हणतो ः

निरंतर नांदते नियती

निढळाच्या नकाशात

मी माझा म्हणणार्‍या

आपल्याच आकाशात!

ती असते तिच्यासारखी

ज्याची त्याची

आणि ती नसते कुणाची?

असतो आपणच नियती

स्वतः ठायी

काट्याकुट्यातून अनवाणी पायी

हिंडणार्‍या प्राक्तनाची

कवीच्या चिंतनशीलतेचे हे नवे रूप आहे. या दीर्घकवितेत प्रयोगशीलता आहे. महाभारतीय संहाराला कारणीभूत ठरलेल्या अनेक व्यक्तिरेखांचे विश्‍लेषण इथे धृतराष्ट्राच्या मुखातून केलेले आहे. ते अर्थातच नव्याने विचार करायला लावणारे आहे. ‘दिगंतर’ ही गौतमबुद्धाच्या जीवनावरील दीर्घकविता या संग्रहात आहे.फ. मुं. शिंदे यांच्या काही कवितांमध्ये अल्पाक्षररमणीयत्वही आढळते. ‘धार’ या कवितेत कवी म्हणतो :

एका फुलाचं

एका गजर्‍याचं

नातं होतं;

एका खुनासाठी

लावलेलं

जीवघेणं

पातं होतं!

प्रा. फ. मुं. शिंदे यांची कविता अशी जीवनातील विविध विभ्रमांची कविता आहे. त्यांची कविता सुंदरतेच्या आणि सुंदर अशा समाजरचनेच्या ध्यासाची आहे. त्यांचा आत्मा सामाजिक विसंगतीमुळे अस्वस्थ होतो. त्यावेळी त्यांच्या मनातील विचार प्रखर निखार्‍याप्रमाणे प्रकट होतात.

त्यांच्या अक्षरसाधनेचा योग्य वेळी गौरव झाला ही समाधानाची बाब वाटते. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!