प्रसारकांविना क्रिकेट मंडळांचा संघर्ष

0
177

जागतिक स्तरावरील क्रिकेट मंडळांना भारतातील प्रसारक मिळणे कठीण बनले आहे. न्यूझीलंड क्रिकेटसाठी २०१७ सालापासून स्टार स्पोर्टस् हे प्रसारक होते. परंतु, आता किवी संघ प्रसारकाविना आहे. भारताच्या जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात झालेल्या न्यूझीलंड दौर्‍यानंतर न्यूझीलंड क्रिकेट व स्टार स्पोर्टस् यांच्यातील करार संपला असून स्टारने या कराराचे नूतनीकरण करण्यास अजूनपर्यंत उत्सुकता दाखवलेली नाही. पुढील दोन मोसमांसाठी भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर येणार नाही, हे यामागील प्रमुख कारण आहे.
न्यूझीलंडच्या फ्युचर टूर प्रोग्राम (एफटीपी) भारतीय संघ मार्च २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये येणार आहे. पण, या दौर्‍यात केवळ ३ वनडे सामने होणार आहेत. त्यामुळे संभाव्य आर्थिक नुकसान लक्षात घेता स्टारने अंग काढून घेतले आहे. २०१७ साली झालेल्या करारांतर्गत १८ भारतीय सामन्यांचा (२ कसोटी, ८ वनडे, ८ टी-ट्वेंटी) समावेश होता. जवळपास ३० मिलियन डॉलर्सचा हा करार होता.

स्पार्क स्पोर्टस्‌चा आधार
आपल्या देशातील प्रसारणासाठी न्यूझीलंडकडे स्पार्क स्पोर्टस्‌च्या रुपात प्रसारक आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळ व स्पार्क स्पोर्टस् यांच्यात दीर्घकालीन करार आहे. न्यूझीलंडच्या नवीन एफटीपीची सुरुवात सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेने होणे अपेक्षित आहे.

भारतात प्रसारक मिळणे कठीण
कोरोनामुळे क्रिकेटच्या अनेक मालिका रद्द करण्यात आल्यामुळे किंवा पुढे ढकलण्यात आल्यामुळे प्रसारकांचे मोठे नुकसान झाले आहे. न्यूझीलंड मंडळाला प्रसारक मिळाला तरीसुद्धा त्यांना मागीलवेळेपेत्रा पन्नास टक्क्यांहून कमी रकमेवर समाधान मानावे लागू शकते, असे प्रसारक हक्कांतील तज्ज्ञांचे मत आहे.
कोरोनामुक्रक्रिकेटचे अर्थकारण बिघडले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, क्रिकेट ऑस्ट्रेलिया व इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळ या तीन सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळांना देखील याची झळ बसली आहे.

भारतीय उपखंडासाठी प्रसारक मिळेनात
क्रिकेट वेस्ट इंडीज (सीडब्ल्यूआय), श्रीलंका क्रिकेट (एसएलसी), पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) व बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) या मंंडळांना अजून प्रसारक मिळालेले नाही. मागील कराराच्या रकमेच्या जवळपास त्यांना प्रसारक मिळणे शक्य नाही.

क्रिकेट वेस्ट इंडीज डबघाईला
क्रिकेट वेस्ट इंडीजची आर्थिक परिस्थितीत सर्वांत बिकट आहे. त्यांनी स्वतः आपण आर्थिकदृष्ट्या अतिदक्षता विभागात असल्याचे मान्य केले आहे. मागील सात महिन्यांपासून त्यांना जागतिक प्रसारकासाठीचा करार करता आलेला नाही. टेन स्पोर्टस् (सध्या सोनी पिक्चर्स नेटवर्कचा भाग) सोबतचा त्यांचा करार जानेवारी महिन्यात संपला आहे. सात वर्षांसाठीचा हा करार ९७ मिलियन युएस डॉलर्सचा होता. मागील सहा महिन्यांपासून प्रसारकाविना असल्याने त्यांना दोन तिमाहींचे नुकसान यापूर्वीच झाले आहे. एसपीएनासोबत त्यांची अनेकदा बोलणी झाली असून कराराच्या रकमेबाबत त्यांचे एकमत होऊ शकलेले नाही. भविष्यात करार झाल्यास त्यांना किमान ३० टक्के नुकसान सोसावे लागू शकते.

श्रीलंका मंडळाचा संघर्ष
प्रसारक भागीदार मिळवण्यासाठी श्रीलंकेचा फेब्रुवारी महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. तब्बल ७ वेळा निविदा काढून त्यासाठी वेळेची मर्यादा वाढवूनही त्यांना प्रसारक मिळालेला नाही. भारताचा बहुप्रतिक्षित श्रीलंका दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. ही मालिका झाली असती तर त्यांना प्रसारक मिळाला असता. फ्युचर टूर प्रोग्राममधील त्यांच्या चार मालिका यापूर्वीच रद्द झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट आहे. एसपीएनने प्रसारण हक्कांमध्ये उत्सुकता दाखवली असली तरी त्यांनी श्रीलंका मंडळाला अपेक्षित रक्कम देण्याची तयारी दर्शवली नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांना २५ ते ३० टक्के कमी किमतीत हक्क द्यावे लागू शकतात.

बांगलादेशची तुलनेने स्थिती चांगली
बांगलादेश क्रिकेट मंडळाचा स्थानिक प्रसारणर्ते गाझी टीव्हीसोबतचा करार मार्च महिन्यात संपला आहे. नवीन करारासाठीची प्रक्रिया त्यांनी सुरू केली नाही. पीसीबी व एसएलसीपेक्षा बीसीबीची स्थिती चांगली आहे. त्यांना स्टार, सोनीसारख्या भारतीय प्रसारणकर्त्यांवर अवलंबून रहावे लागत नाही. मागील वेळी २०.१ युएस डॉलर्सला गाझी टीव्हीने हक्क मिळवले होते. यावेळी मोठी रक्कम बीसीबीला मिळणे कठीण असले तरी गाझी टीव्ही, चॅनेल नाईनसारखे प्रसारणकर्ते असल्यामुळे त्यांचे काम फारसे कठीण नाही.

पीसीबीला भारतातील प्रसारक मिळणार?
पीसीबीने प्रसारण हक्क देण्याची सुरुवात केल्यापासून प्रत्येकवेळी त्यांना भारतीय खरेदीदार मिळाला आहे. परंतु, राजकीय परिस्थिती पाहिल्यास त्यांना यावेळी भारतीय खरेदीदार मिळणे कठीण आहे. पीसीबीचा टेन स्पोर्टस् (एसपीएन) यांच्यासोबतचा करार संपला आहे. त्यामुळे पीसीबीला सध्या प्रसारक नाही. पीसीबीची मायदेशातील पुढील मालिका ऑक्टोबर महिन्यात नियोजित आहे. परंतु, त्यांनी प्रसारण हक्कांसंबंधी प्रक्रिया अजून सुरू केलेली नाही. भारतीय उपखंडातील स्टार इंडिया हे प्रमुख प्रसारणकर्ते असून ते पीसीबीपासून दूरच राहण्याची शक्यता आहे.