प्रवासातील सोबती…

0
226

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
नेहमीच आम्ही दुसर्‍यांचे निरीक्षण करतो.त्यांच्या छोट्या छोट्या हालचाली, बोलणे-चालणे बघतो व त्यावरून तो माणूस स्वभावाने कसा असेल याचा निष्कर्ष काढतो. लक्षात ठेवा कुणीतरी कोपर्‍यावरून तुमचेही निरीक्षण करत असणार! एकदा मी माझ्या इतर डॉक्टर मित्रांबरोबर ड्युटीवर होतो. जागा होती डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. पेशंट नव्हते. संध्याकाळचे सहा वाजलेले. गप्पागोष्टी चाललेल्या. बोलता बोलता आमची चर्चा ‘‘देहबोली’’वर येऊन थांबली. माणसाची देहबोली त्याच्या राशीप्रमाणे असते. चांगले निरीक्षण केले तर त्यांची देहबोली त्यांचा स्वभाव सांगून जाते. यावर संशोधन झालेले आहे.. पुस्तके लिहिली गेलीत. मंडळी, ही पुस्तके वाचून मी जर स्वतःला बदलले तर..! पाहणार्‍याला वाटेल मी तसा आहे, पण मी तसा नाही ना… कारण मी असा आहे! मी स्वतःला लपवलेय. मग कुणा एका बिरबलाला बोलवायला लागेल. हो की नाही? ते असो. मी त्यातल्या एका डॉक्टरला म्हटले, ‘‘तुमची दोन्ही हात खिशांत टाकून, ऐटदार टांगा टाकत, संथ चालण्याची लकब मला सांगते की ‘‘तुम्ही चलाख आहात, स्वतःवर तुम्ही जास्तच फाजील विश्‍वास ठेवता. तुम्ही चालताना गजराजासारखे चालता… तुम्ही दुसर्‍यांना तुच्छ लेखता…!’’ आणखी काही सांगण्याअगोदर स्वारी उठून चालती झाली. हळूहळू बरोबरच्या बाकी डॉक्टरांनीही आपला गाशा गुंडाळला. जाता जाता एकटा तर विचारायला लागला- या विषयाचा तुम्ही चांगलाच अभ्यास केलेला दिसतो.हल्लीच मी व माझी बायको राजस्थानच्या मेवाड मारवाड सफरीवर निघालो. कित्येक वर्षांनंतर हा योग आला होता. आमचा बारा जणांचा ग्रुप होता. बहुतेक ज्येष्ठ नागरिकच होते. जास्तशा गृहिणीच होत्या. दहा दिवसांकरता ‘‘रांधा वाढा उष्टी काढा’’ बंद होणार होते. ‘‘चला बाई सुटका झाली. कुणी पहिल्यांदाच एकटे आले होते. स्वतःचे माणूस जवळ नसल्याचे भान होते तरीदेखील दहा दिवस आपले आपल्या मनासारखे जगणे घडेल याचे सुख होते!
डॉक्टर म्हटल्यावर माझी जबाबदारी उगाचच वाढली होती. माझे तपासणीचे सामान, गोळ्या, इंजेक्शन्स वगैरे बरोबर घेतले होते. ग्रुपमधली थोडी माणसे परिचयाची होती, पण त्यांच्या आजाराविषयी मी अनोळखी होतो. ही म्हणत होती, ‘‘अहो, इन्जेक्शन्स कशाला? पण मला तयारीत रहावेच लागणार, हो की नाही?’’
तर आमच्या पुढच्या सफरीसाठी आमच्या बरोबर आता दहा दिवस असणार्‍या या प्रवासातील व्यक्ती आणि वल्लींविषयी आम्ही बोलू. आयोजक आमच्याच वाड्यावरचे.. आम्हाला व आमच्या सामानाला गाडीत टाकून निघाले. त्यांचा अनुभव चांगला दांडगा होता. आमची पहिलीच फेरी होती. तेव्हा त्यांच्या अनुभवाचा आम्हाला काहीही अनुभव नव्हता. गाडी विमानतळावर पोहोचली. सगळे जमले. डोळे डोळ्यांस भिडले. फैरी झडल्या. वरपांगी ओळखही झाली. नेहमीप्रमाणे माझी नजर त्यांच्या नजरेतून त्यांच्या शरीरात घुसली.. त्यांच्या मेंदूत, काळजात जाऊन त्यांचा ठाव घेण्याचा प्रयत्न करू लागली. अहो राव, थांबा. अजून कितीतरी दिवस आहेत. ही सर्व लोकं तुमच्याच संगतीत राहतील. आता आमचा घोळका बारा जणांचा… त्यांत मी स्वतः! माझा स्वभाव तर मला माहीत होताच! मग… माझ्या सौ. तिला तर मी चांगलाच जाणून होतो. यादीतील दोन नावे गळाली. आमचे शेजारी, मित्र, नातेवाईक अशी कित्येक बिरुदे लावणारे .. अगदी परिचित इसम! मागे त्यांनी मला म्हटले होते, ‘‘कृपा करून माझ्यावर तेवढे लिहू नका. त्यांच्यावर लिहिण्यासारखे पुष्कळच आहे. त्यांनी काही न लिहिण्याबद्दल चिरीमिरी चारली तर ठीक. नाहीतर त्यांच्यावरही मी लिहीन हे त्यांना सांगावे लागणार. मेसेज दिलेली बरी! आता विमानतळावरच लिहायला घेतले, म्हटल्यावर ते थोडे साशंक झाले. नाहीतर शेवटच्या यायच्या दिवशी दिल्ली विमानतळावर पाच तास बसायचे म्हटल्यावर पहिल्यांदाच डोळे जड झाले होते. त्यात ‘रेस्टिंग एरिया’वर धूळ पसरलेली होती. दोन माणसे नाकावर वेष्टन बांधून काम करत होती. आमच्या तोंडावर कोण बांधणार!
पहिल्यांदाच सर्दीने बेजार झालेल्यांनी पळ काढला. ऍलर्जी असलेल्यांनी ही काढता पाय घेतला. आयोजक धावत आले. म्हणाले, ‘‘चला, हवेशीर जागेत जाऊ.’’ सगळीच विमाने उशिरा धावत होती. भयंकर गर्दी झाली होती. तो शेजारी वगळला गेला. आयोजक व त्यांची बायको यांच्यावर आज तरी लिहायचे नव्हते. राहिलेल्यांपैकी एकटी तर माझ्या हाताखाली काम करून गेलेली होती. तेव्हा मन म्हणाले, तिला वगळा… चला ठीक म्हणत मी राहिलेल्यांकडे वळलो.
त्यांत मला जास्त मोहीत कुणी केले असेल तर बहीण-भावाच्या जोडीने… आगळी वेगळी जोडी होती ती! एक एका टोकावर तर दुसरी दुसर्‍या! दोघांच्याही स्वभावात प्रचंड फेरफार. दोघांचीही साठी केव्हाच उलटून गेलेली. बहिणीचा प्रवासाचा अनुभव दांडगा व आयोजकांना तिचा स्वभाव चांगलाच माहितीचा झालेला. त्यांच्याकडे बघत, त्या दहा-बारा दिवसांच्या निरीक्षणाने माझ्या स्वभावात प्रचंड उलथापालथ झाली.
मला एका डॉक्टर मित्राची आठवण झाली. कुठल्याही परिषदेला जायचे आमंत्रण आले तर पहिल्यांदा फी चा विचार करायचा… प्रत्येक जण तो करतातच. ते कोणत्या प्रकारची बॅग देणार… त्यात काय वस्तू टाकणार… याची चौकशी झाल्यावर मग तो हिशेब करायचा, वर जेवणाचे, पाण्याचे त्यात जोडायचे. वर प्रवासाचा खर्च सहयोगी उचलत असेल तर विचार करावा लागेल. चांगले जेवणे., खाणे-पिणे झाल्यावर झोपणार कुठे? हा प्रश्‍न कुणी निकालात काढला व तिथेच सोय झाली तर मग पुढचा महत्त्वाचा प्रश्‍न रात्री डिनर पार्टी झाल्यावर आपल्याला खोलीपर्यंत कोण सुखरूपपणे पोहोचवणार… याचा ताळेबंद करीत फायद्याचे ठरत असेल तरच होय म्हणायचे. हिशेब जमत नसेल तर थोडे हॉटेलचे काटे-चमचे बरोबर घ्यायचे आठवण म्हणून! हा भाग झाला भरलेल्या पैशांचा पुरेपूर लाभ घेत आपला फायदा करून घेणे. बरोबर हेच मी या जोडीकडून शिकलो. मला माझ्या अज्ञानाची जाण झाली. माझ्या जीवनात एका गुरूची भर पडली. ही भावा-बहिणीची जोडी (अफलातून). आपण भरलेल्या पैशांची दररोज भरपाई करत होती. ग्रुपमधले जास्त लोक शाकाहारी…म्हणजे प्रवासात मांस काही खायचे नाही. मासळी तर तिथे मिळतच नव्हती. त्यात आमची ही..पण त्याच घोळक्यात शिरली. मी म्हणतो ‘‘नवर्‍याचा विचार तरी करावा’’. तरीही मध्ये मध्ये मी कशीबशी हौस भागवून घेतली… वेगळ्या टेबलावर… वेगळ्या मेनुसोबत… वेगळ्याच ढंगात… पण हॉटेल पूर्णपणे शाकाहारी असल्यावर गोची व्हायची. बाहेर हॉटेलशेजारी वाचलेल्या बकर्‍याकडे जिभल्या चाटत पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मग तो बकरा आपल्या गालांत हसत मला बघायचा!
त्या जोडीचा थाट औरच होता. जेवणाची सुरुवात सूप घेऊन करायचे. पहिल्या दिवशी कमालच झाली. जेवण संपल्यावर सूप आलं. तरीही त्या सूपचा यथोचित माचार घेत स्वारींनी नेसकॉफीची ऑर्डर दिली. मी स्तंभितच झालो. आयोजकांची उगाचच गोची करण्याचे मला जमत नव्हते. माझे नेहमीचे जेवण मी जेवलो. सगळी बसलेली तरीही सर्वांच्या तोंडावर प्रचंड ढेकर देत भाऊ उठला. (क्रमशः)