- डॉ. मनाली महेश पवार
जागतिक आरोग्य संघटनेद्वारे आयुर्वेदाला पारंपरिक औषधप्रणाली म्हणून मान्यता मिळाली. ‘आयुष’ने 2016 मध्ये धन्वंतरी जयंती ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून घोषित केली. या वर्षी 10 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जाईल व या वर्षाची थीम आहे- ‘हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद.’ त्यानिमित्त….
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे दरवर्षी धन्वंतरी जयंती किंवा धनत्रयोदशी हा ‘आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या वेदांमध्ये भगवान धन्वंतरी यांना देवांचे वैद्य म्हटले आहे. तसेच आयुर्वेदाचे जनक असेही म्हटले आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार देव धन्वंतरी हे देवांचे चिकित्सक होते. मानवाच्या कल्याणासाठी आयुर्वेदाचा आशीर्वाद देणारी देवता म्हणून ती ओळखली जाते.
एका कथेनुसार भगवान धन्वंतरी समुद्रमंथनाच्या वेळी अमृतकलश आणि आयुर्वेद ग्रंथ हातात घेऊन समुद्रातून प्रकट झाले. देव आणि असुरांमध्ये अमृतासाठी युद्ध झाले तो दिवस म्हणजे धनतेरस. हिंदू या दिवशी उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी भगवान धन्वंतरीची पूजा करतात आणि आशीर्वाद घेतात. अशा प्रकारे धन्वंतरी जयंती हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस ठरला.
जागतिक आरोग्य संघटनेद्वारे आयुर्वेदाला पारंपरिक औषधप्रणाली म्हणून मान्यता मिळाली. आयुषने 2016 मध्ये धन्वंतरी जयंती ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून घोषित केली. या वर्षी 10 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जाईल व या वर्षाची थीम आहे- ‘हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद.’
आयुर्वेदशास्त्राबद्दल जनजागृती करणे हे या दिवशीचे उद्दिष्ट आहे. आजच्या प्रगत, गतिमान युगात जन्माला येणारा प्रत्येक मनुष्यजीव काहीतरी व्याधी स्वतःबरोबर घेऊनच जन्माला येत आहे. तेव्हा विविध आजारांपासून मुक्ती देणारे व महत्त्वाचे म्हणजे स्वास्थ्याचे रक्षण कसे करावे हे सांगणारे हे आयुर्वेद शास्त्र आहे. सर्वसामान्याला माहीत असलेला पालापाचोळा, काढे, चूर्ण व कडू औषधे म्हणजे आयुर्वेद? का पंचकर्म म्हणजे ‘मसाज’ करणे हा आयुर्वेद? अशा प्रकारचे अनेक गैरसमज दूर करणे हे या आयुर्वेद दिनाचे उद्दिष्ट आहे.
आयुर्वेद हे प्राचीनतम शास्त्र आहे. पण आजच्या युगात ते जाणून घेणे, त्याचे आचरण करणे ही काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे इतर देशांनी ‘योगशास्त्र’ जाणले व त्याचा अवलंब करायला सुरुवात केली, त्याचप्रमाणे आयुर्वेदशास्त्रही बऱ्याच इतर देशांत प्रचलित होताना दिसत आहे. आपणच या शास्त्राचा प्रसार, प्रचार व आचरण करण्यास कमी पडत आहोत.
आयुर्वेद म्हणजे काय?
आयू म्हणजे आयुष्य, वेद म्हणजे ज्ञान. आयुष्याचे ज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदाची उत्पत्ती मानवाची आरोग्यसंपन्नता टिकविण्यासाठी झालेली आहे. आयुष्याचे प्रयोजन सुखप्राप्ती. सुखप्राप्तीसाठी शरीर व मानसस्वास्थ्य बऱ्याच प्रमाणात परस्परावलंबी असल्याने त्या दोहोंच्याही स्वस्थ-अस्वस्थ्याचा विचार एकत्रितपणे करणे आवश्यक ठरते. म्हणूनच आयुर्वेदाचा उद्देश आहे- ‘स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं आतुरस्य व्याधिपरिमोक्षः।’
रोगी व्यक्तींचा रोगनाश, यापेक्षाही स्वस्थ मनुष्याचे स्वास्थ्यरक्षण या उद्देशाला आयुर्वेदाने अग्रक्रम दिला आहे. कारण स्वास्थ्य असणे ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. त्याच्या रक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या शास्त्राचे आचरण जर केले नाही तरच आजार होतात व या आजारांचे परिमोक्ष करणे म्हणजे पर्यायाने पुन्हा स्वास्थ्य प्रस्थापित करणेच असते. आयुर्वेदशास्त्र फक्त आजारावर चिकित्सा करत नाही तर रोग होऊ न देणे यासाठी प्रयत्न, आचरण, नियम यांचे ज्ञान देते व रोग होऊच देत नाही.
आयुर्वेदशास्त्राचे आचरण का करावे?
- आयुर्वेदशास्त्र हे एक रोगप्रतिबंध करणारे अमृत आहे. ‘कायबालग्रहोर्ध्वागशल्यदंष्ट्राजरावृषान्’ अशा आठ उपांगानी आयुर्वेदशास्त्र व्यापलेले आहे. ग्रहबाधेमुळे होणाऱ्या रोगांची चिकित्सा सांगणारे हे एकमेव शास्त्र आहे. त्याचबरोबर रसायन व वाजीकरण चिकित्सेद्वारे मनुष्य शतायूपेक्षा जास्त निरोगी, निरामय आयुष्य कसे जगू शकतो याचे सविस्तर विवेचन करणारे हे एकमेव आरोग्याचे शास्त्र आहे. म्हणून आयुर्वेदशास्त्राचे आचरण करावे.
- आयुर्वेदशास्त्रामध्ये असात्म्येइंद्रियार्थ संयोग, पज्ञापराध व परिणाम असे रोगांचे त्रिविध हेतू (कारणे) सांगितले आहेत. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या उपदेशाचे उल्लंघन केल्यामुळे घडून येणारे हे हेतू आहेत. म्हणजेच चुका न केल्या तर व्याधी होण्याची शक्यता राहणार नाही व यासाठी चुका कोणत्या व स्वास्थ्यरक्षणाचे योग्य मार्ग कोणते हे आयुर्वेदशास्त्र ‘स्वस्थवृत्त’ या शास्त्राद्वारे शिकवते. म्हणून आयुर्वेदशास्त्राचे आचरण करावे.
- व्याधी उत्पन्न झाल्यावर करावयाच्या उपायांचे ज्ञान वैद्यांच्या अधीन असते. परंतु व्याधी उत्पन्न होऊ न देण्यासाठी आचरावयाच्या शास्त्राचे ज्ञान ग्रहण करणे व त्याप्रमाणे आचरण करणे ही गोष्टी व्यक्ती व समाजाच्या आटोक्यामधील असते. यातील शास्त्रीय सखोलता कळली नाही तरी विश्वास ठेवून समाजाने ते नियम पाळले तरी व्यक्ती व समाजाचे स्वास्थ्यरक्षण होऊ शकते. हे सद्वृत्ताचे नियम, आचरण आयुर्वेदशास्त्रातच आढळते म्हणून आयुर्वेदशास्त्राचे आचरण करावे.
- मनाच्या रज-तमाच्या दोषांमुळे स्वास्थ्याचे नियम पाळले जात नाहीत व प्रज्ञापराध घडतात व विविध मानसिक रोग उत्पन्न होतात. हे प्रज्ञापराध घडू नयेत म्हणून जे स्वस्थवृत्ताचे महत्त्व आहे, योगाभ्यास आहे, मंत्रोपचार आहेत ते आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णिले आहेत. राज्ययंत्रणेला या स्वस्थवृत्ताचे महत्त्व पटवून दिले तर ते सर्वसामान्यांपर्यंत पोचते म्हणून आयुर्वेद दिवस साजरा केला जातो.
- जनपदोद्ध्वंस व्याधींमध्ये त्या-त्या ठिकाणच्या देश, काल, तेज, वायू, काल इत्यादी सर्व समाजाशी संबंध असणाऱ्या व्यापक गोष्टींचीच दुष्टी झालेली असते. या विशिष्ट परिस्थितीत आचारायचे नियम, दक्षता, उपाययोजना यांचा विचार आयुर्वेदशास्त्रात मांडलेला आहे. याचा प्रत्यय प्रत्येकालाच ‘कोरोना’च्या काळात आलेला आहे. म्हणून आयुर्वेदाचे आचरण करावे.
- आयुर्वेदशास्त्रामध्ये प्रकृती परीक्षण, नाडी परीक्षणाला विशेष महत्त्व दिले आहे. प्रकृती परीक्षणावरून किंवा नाडी परीक्षणावरून चिकित्सा केली जाते. म्हणून आयुर्वेदशास्त्राचे आचरण करावे.
- आयुर्वेद हे असे एकमेव शास्त्र आहे ज्यात औषधांबरोबर ‘अनुपाना’ला महत्त्व आहे. औषधी द्रव्य सेवन करताना ते ज्या द्रव्याबरोबर दिले जाते, त्याला ‘अनुपान’ म्हणतात. औषधी द्रव्य सेवन करणे सोयीचे व्हावे, औषधाचे गुणधर्म वाढावेत, औषधामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळता यावेत या विविध कारणांसाठी ‘अनुपाना’चा वापर केला जातो. मध, तूप, गरम पाणी, साखर, दूध इत्यादी अनुपान द्रव्ये आहेत. शतावरी, अश्वगंधासारखी औषधे दुधाबरोबरच घ्यावीत. एरंडेल तेल, त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबरच द्यावे. हे आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले आहे म्हणून आयुर्वेदशास्त्राचे आचरण करावे.
- आयुर्वेदशास्त्रात रोग्याचे शारीरिक व मानसिक बल, दिवस-रात्र, ऋतुमान यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार केला जातो. अनन्नकाल, प्रागभुक्त, अधोभुक्त, मध्येभुक्त, अंतराभुक्त, सभुक्त, सामुद्ग, सग्रास, ग्रासांवर, मुहुर्मुहु, निशिकाल असे अकरा औषध सेवनकाल फक्त आणि फक्त आयुर्वेदशास्त्रातच सांगितले आहेत. म्हणून आयुर्वेदशास्त्र जाणावे.
- ‘रोगाः सर्वेऽपि जायन्ते वेगोदीरणधारणैः।’ विविध वेगांचे उदा. अधोवात, मलवेग, मूत्रवेग, शुक्रवेग, तृष्णावेग, क्षुधावेग, उदूगार, शिंक, अश्रू, श्रमश्वास, खोकला, उलटी, झोप यांचा अवरोध केल्याने विविध रोग उत्पन्न होतात. हे फक्त आयुर्वेदशास्त्रामध्येच वर्णित आहे.
- रोग आटोक्यात राहावा, अधिक वाढू नये, चिकित्सेला सहाय्य राहावे यासाठी आहार-विहारावर नियंत्रण ठेवावे लागते. यालाच पथ्यापथ्याचे पालन म्हणतात. पथ्यापथ्याचा विचार केल्याखेरीज औषधांचा यथायोग्य उपयोगच होत नाही. ‘पथ्यापथ्य’ ही संकल्पनादेखील आयुर्वेदशास्त्रातच वर्णित आहे म्हणून आयुर्वेदशास्त्राचे आचरण करावे.
- ‘दोषधातुमलामूलंहि शरीरम्।’ शरीर हे त्रिदोष (वात, पित्त, कफ), सप्तधातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र) व तीन मल (पुरिष, मूत्र व स्वेद) याने बनलेले आहे. हे शरीर स्वस्थ, निरोगी राहण्यासाठी त्याच्या क्रियाव्यापारात कोणतेही वैषम्य असू नये. सर्व क्रियाव्यापारांना अग्नीचे बल अत्यावश्यक आहे. यांच्या सुयोग्य क्रियाव्यापारामुळे इंद्रियाची प्रसन्नता व इंद्रिय प्रसन्नतेमुळेच मनाची प्रसन्नता टिकणार. या प्रसन्नतेचा- सुखाचा भोग आत्म्याला मिळणार व आत्मा म्हणजेच आपण सुखी व प्रसन्न राहणार. म्हणून शरीरातील दोष-धातू, मल, अग्नी यांचे साम्य व त्यामुळे इंद्रिये, मन व आत्मा यांच्या ठिकाणी प्रसन्नता असणे हेच ‘स्वस्थ’ व्यक्तीचे लक्षण होय. आणि असे हे निरोगी, निरामय आयुष्य बनण्यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये दिनचर्या- रात्रिचर्या, ऋतुचर्या, रसायन-वाजीकरण, पंचकर्मसारखे उपक्रम सांगितले आहेत.
- दिनचर्या ः प्रातःकाली उठल्यापासून पुन्हा दुसऱ्या दिवशी उठेपर्यंतच्या काळात आचारावयाची चर्या. दिनचर्येमध्ये अभ्यंग, नस्य, धूमपान, स्नान, ब्रह्मकर्म इत्यादी आचरावयाच्या कार्यांचेच वर्णन प्रामुख्याने केलेले आहे. नेहमी नसले तरी सुट्टीच्या दिवशी, आठ दिवसांतून एकदा तरी अंजन, नस्य, अभ्यंगादी कर्मे आचरावी. आरोग्यकारक निद्रा घ्यावी.
- ऋतुचर्या ः आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्षाचे सहा ऋतू सांगितले आहेत. या ऋतूंमध्ये हवामानातील बदलाप्रमाणे दोषांचा संयच, प्रकोप व प्रशमन होत असते. अग्नीचे बलही कमी-अधिक असते. शारीरिक-मानसिक बलही बदलत असते. अशा परिस्थितीत ऋतुचर्येमध्ये सांगितल्याप्रमाणे आहार-विहाराचे आचरण करावे.
- पंचकर्म ः पंचकर्म हे शरीरातील प्रकुपित दोष बाहेर काढण्याचे शोधन उपक्रम आहेत. स्वास्थ्यरक्षणासाठी वसंत ऋतूमध्ये वमन करून घ्यावे. शरद ऋतूमध्ये विरेचन व वर्षामध्ये बस्ती घ्यावी.
- रसायन ः रस, रक्तादी सप्तधातूंच्या वर्धनासाठी ज्या उपक्रमांचा उपयोग केला जातो, त्यांना रसायन म्हणतात. रसायनाने प्रशस्त अशा धातूंची निर्मिती होते व साहजिकच वयःस्थापन घडते व अकाली येणारे वार्धक्य टाळता येते. वुद्धिवर्धन, बलवर्धन व रोगनाशन यांचे सामर्थ्य रसायनाने प्राप्त होते, म्हणूनच जन्मल्यापासूनच मुलांना ‘सुवर्णप्राशन’ द्यावे. सुवर्ण, शतावरी, अश्वगंधा, ज्येष्ठमध, गुडूची, ब्राह्मी, शिलाजित इत्यादी ही श्रेष्ठ रसायनद्रव्ये आहेत.
- वाजीकरण ः वाजी म्हणजे घोडा. घोड्याप्रमाणे मैथुनसामर्थ्य प्राप्त होण्यासाठी ज्या आहार-विहार किंवा औषधांचे सेवन मनुष्य करतो व ज्यामुळे तो अधिक वेळा व अधिक काळपर्यंत मैथून करू शकतो, त्या सर्व उपक्रमांना वाजीकरण असे म्हटले जाते. आजचे वंध्यत्वाचे प्रमाण पाहता वाजीकरण उपक्रमाचे महत्त्व लक्षात येते.
दिनचर्या, ऋतुचर्याचे आचरण करून, पंचकर्माद्वारे शरीर शुद्ध करून रसायन, वाजीकरण द्रव्यांचे सेवन केल्यास व सद्वृत्त-स्वास्थ्यवृत्ताचे आचरण केल्यास मनुष्य शंभर वर्षे निरोगी, आनंदी व सुखाने आयुष्य जगू शकतो व हे केवळ नि केवळ आयुर्वेदशास्त्राचे योग्य ज्ञान करून घेऊन ते आचरणात आणल्यानेच होऊ शकते.