द्विशतकवीर मॅक्सवेलने पलटवली बाजी!

0
3

>> अफगाणिस्तानवरील सनसनाटी विजयासह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

ग्लेन मॅक्सवेल याने केवळ 128 चेंडूंत 21 चौकार व 10 षटकारांसह झोडपलेल्या नाबाद 201 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पराभवाच्या दाढेतून विजय खेचून आणत अफगाणिस्तानवर 3 गडी व 19 चेंडू राखून सनसनाटी विजयाची नोंद केली. मॅक्सवेल याला दुखापतीमुळे नीट चालता येत नव्हते. पण तरीही त्याने खेळपट्टीवर थांबण्याचा निर्णय घेतला आणि द्विशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

ऑस्ट्रेलियाला या सामन्यात विजयासाठी 292 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची आघाडी व मधली फळी स्वस्तात तंबूत परतवली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 7 बाद 91 अशी स्थिती झाली होती. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी महत्वपूर्ण भागीदारी पार पाडली. दोघांनी आठव्या विकेटसाठी 202 धावांची भागीदारी केली. पॅट कमिन्स याने मॅक्सवेलची साथ देत 68 चेंडू खेळले आणि नाबाद 12 धावा केल्या. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील आठव्या गड्यासाठीची ही सर्वांत मोठी भागीदारी ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या अँडी हॉल व जस्टीन केंप यांचा 138 धावांची विक्रम या दोघांनी मोडला. मॅक्सवेलला दीर्घकाळ खेळपट्टीवर उभा राहिल्यामुळे खेळताना त्रास होत होता. 41वे षटक सुरू असताना तर त्याला खेळपट्टीवर धावणे अशक्य झाले. पण तिरीही त्याने मैदान सोडले नाही. ॲड झॅम्पाने फलंदाजीसाठी येण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, मॅक्सवेलने मैदान सोडले नाही. कर्णधार पॅट कमिन्सनेही त्याच्यावर विश्वास दाखवला आणि मॅक्सवेल संघासाठी मॅच विनर ठरला. केवळ एका पायावर भार देऊन खेळत असणाऱ्या मॅक्सवेलने एकापेक्षा एक षटकार आणि चौकार या सामन्यात मारले.

उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक अफगाणिस्तानने जिंकली होती. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघ 50 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 291 धावा करू शकला. यात सर्वाधिक धावा इब्राहिम झादरान याने केल्या. सलामीवीर इब्राहिमने 143 चेंडूत नाबाद 129 धावांची अप्रतिम खेळी या सामन्यात केली. अफगाणिस्तानकडून विश्वचषकात शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियासारख्या भेदक गोलंदाजी आक्रमणाला 21 वर्षीय इब्राहिमने अक्षरशः फोडून काढले. इब्राहिमव्यतिरिक्त या सामन्यात एकही अफगाणी फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. शेवटच्या षटकांमध्ये रशीद खान याने 18 चेंडूत नाबाद धावांची वादळी खेळी मात्र केली.
अफगाणिस्तानसाठी सलामीवीर रहमानुुल्लाह गुरबाज याने 21, तिसऱ्या क्रमांकावरील रहमत शाह याने 30, कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने 26, अझमतुल्ला ओमरझाय याने 22, तर महंमद नबी याने 12 धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानच्या सर्वाधिक दोन गडी जोश हेजलवूड याने बाद केले. मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि ॲडम झॅम्पा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

धावफलक
अफगाणिस्तान ः रहमानुल्लाह गुरबाज झे. स्टार्क गो. हेझलवूड 21, इब्राहिम झादरान नाबाद 129 (143 चेंडू, 8 चौकार, 3 षटकार), रहमत शाह झे. हेझलवूड गो. मॅक्सवेल 30, हशमतुल्लाह शाहिदी त्रि. गो. स्टार्क 26, अझमतुल्लाह ओमरझाय झे. मॅक्सवेल गो. झॅम्पा 22, महंमद नबी त्रि. गो. हेझलवूड 12, रशीद खान नाबाद 35 (18 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार), अवांतर 16, एकूण 50 षटकांत 5 बाद 291
गोलंदाजी ः मिचेल स्टार्क 9-0-70-1, जोश हेझलवूड 9-0-39-2, ग्लेन मॅक्सवेल 10-0-55-1, पॅट कमिन्स 8-0-47-0, ॲडम झॅम्पा 10-0-58-1, ट्रेव्हिस हेड 3-0-15-0, मार्कस स्टोईनिस 1-0-2-0

ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. ओमरझाय 18, ट्रेव्हिस हेड झे. इक्रम गो. नवीन 0, मिचेल मार्श पायचीत गो. नवीन 24, मार्नस लाबुशेन धावबाद रहमत 14, जोश इंग्लिस झे. इब्राहिम गो. ओमरझाय 0, ग्लेन मॅक्सवेल नाबाद 201 (128 चेंडू, 21 चौकार, 10 षटकार), मार्कस स्टोईनिस पायचीत गो. रशीद 6, मिचेल स्टार्क झे. इक्रम गो. रशीद 3, पॅट कमिन्स नाबाद 12, अवांतर 15, एकूण 46.5 षटकांत 7 बाद 293
गोलंदाजी ः मुजीब उर रेहमान 8.5-1-72-0, नवीन उल हक 9-0-47-2, अझमतुल्लाह ओमरझाय 7-1-52-2, रशीद खान 10-0-44-2, नूर अहमद 10-1-53-0, महंमद नबी 2-0-20-0