गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी अखेर कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी बिना शांताराम नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नावेली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर प्रतिमा कुतिन्हो नाराज होत्या. कॉंग्रेसचे नावेलीचे आमदार लुईझीन फालेरो यांच्या असहकारामुळे पराभव झाल्याचा आरोप कुतिन्हो यांनी केला होता. कुतिन्हो यांनी नवी दिल्ली येथे आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी आपचे गोवा निमंत्रक राहुल म्हांबरे यांची उपस्थिती होती.
राज्यात कॉँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रतिमा कुतिन्हो कार्यरत होत्या. कॉँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्या गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. तथापि, त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करून सर्वांना धक्का दिला आहे. आम आदमी पार्टी गोव्यात निश्चित बदल घडवून आणू शकते, असा विश्वास कुतिन्हो यांनी व्यक्त केला.