पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने २४ तासांसाठी प्रचारबंदी लागू केली आहे. प्रचारबंदी लागू करण्यात आल्याच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून आंदोलनादरम्यान त्यांनी कोणतेही विदान केले नाही. यावेळी त्या चित्र काढत असल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाने आपल्यावर घातलेली प्रचारबंदी पूर्णपणे घटनाविरोधी असल्याची भूमिका घेत त्याचा निषेध करण्यासाठी ममता बॅनर्जींनी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मायो रोड परिसरात धरणे आंदोलनाला बसल्या. निवडणूक आयोगाची ही बंदी सोमवार १२ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून लागू झाली व ती मंगळवार १३ एप्रिल रात्री ८ वाजेपर्यंत होती.
‘दुष्ट विचारांच्या मंडळींचे ऐकून अल्पसंख्याक मते विभाजित होऊ देऊ नका अशी विनंती मी आमच्या अल्पसंख्याक बंधू-भगिनींना करते’ हे, तसेच ‘केंद्रीय दले कोणाच्या इशार्यावर लाठ्या चालवतात हे आम्हाला ठाऊक आहे. आमच्या आयाबहिणींवर एक जरी लाठी उगारली गेली, तर त्यांचा शस्त्रांनिशी प्रतिकार करा’ अशी दोन्ही विधाने विविध कायद्यांचा भंग करतात असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आपण धार्मिक विभागणी नव्हे, तर धार्मिक सलोख्याचे आवाहन केले होते. तसेच केंद्रीय दलांना लोकशाही मार्गाने केवळ घेराव घालण्याचे आवाहन केले होते, अशी उत्तरे ममतांनी त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशींना दिली होती. या उत्तरांवर आयोगाचे समाधान झाले नाही.
भाजप नेते सिन्हा यांच्यावरही कारवाई
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नंतर निवडणूक आयोगाने भाजप नेते राहुल सिन्हा यांच्यावर कारवाई केली असून त्यांच्यावर ४८ तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली आहे. राहुल सिन्हा यांनी बिहारमधील सीतलकूची येथे चार नाही तर आठ लोकांना ठार करायला हवे होते असे वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना नोटीस पाठवली आहे.
दिलीप घोष यांनाही निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली असून बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाला तर अशा घटना होत राहतील असे दिलीप घोष यांनी म्हटले होते.