Home Featured पोलिसांनी आंदोलकांच्या बसेस अडवल्याने संताप

पोलिसांनी आंदोलकांच्या बसेस अडवल्याने संताप

0

नगरनियोजन कायद्यातील कलम 39 अ विरोधात पणजीतील आझाद मैदानावरील महाआंदोलनासाठी येणाऱ्या बसेस विविध ठिकाणी पोलिसांनी अडवल्याने संताप व्यक्त करण्यात आला. बसेस अडवल्याचे वृत्त आल्यानंतर आझाद मैदानावर जमलेले लोक संतप्त बनले. ही हुकूमशाही आहे. हे असले कृत्य सरकारला शोभत नाही. आमच्या आंदोलनात सरकारने खोडा घालायचा प्रयत्न केला तर ते सहन केले जाणार नाही, अशा प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली.

या आंदोलनासाठी राज्यभरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने आझाद मैदानावर लोक जमलेले असतानाच अन्य कित्येक भागांतून लोकांना घेऊन येणाऱ्या बसेस सरकारी आदेशामुळे पोलिसांनी अडवून धरण्याच्या ज्या घटना घडल्या, त्या लोकशाहीविरोधी असल्याचे मत अमित पाटकर यांनी व्यक्त केले. कुंकळ्ळी मतदारसंघातून येणाऱ्या दोन बसेससह विविध भागांतून येणाऱ्या एकूण 11 बसेस आझाद मैदानावर पोचू नयेत यासाठी सरकारने पोलिसांना त्या अडवण्याचे आदेश दिल्याने या सभेसाठी येऊ घातलेले हजारो लोक सभास्थळी पोहोचू शकले नसल्याचे पाटकर म्हणाले. असे असतानाही आझाद मैदानावर हजारो लोक जमले व त्यांनी आपल्या शक्तीचे दर्शन घडवल्याचे पाटकर म्हणाले.

कालच्या महाआंदोलनासाठी गावागावातील लोकांबरोबरच राज्यभरातील विविध बिगर सरकारी संघटनांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने हजर होते. राजकीय नेत्यांमध्ये विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस व क्रूझ सिल्वा, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे अध्यक्ष मनोज परब, काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर तसेच गोवा फॉरवर्डचे मोहनदास लोलयेकर, आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई, रिव्होल्युशनरी गोवन्स व तृणमूल काँग्रेस आदी पक्षांचे नेते व कार्यकर्ते, तसेच नगर नियोजन कायद्याच्या 39 अ या कलमाला विरोध करणारे लोक मोठ्या संख्येने हजर हेते. आयोजकांनी या महाआंदोलनाला हजर असलेल्या लोकांची संख्या ही चार हजारांच्या आसपास असल्याचे सांगितले.

पुरुषांपेक्षा महिलाच आघाडीवर
सध्या चालू असलेल्या महाआंदोलनात पुरुषांपेक्षा महिलांचाच सहभाग जास्त असून, या महिला 39 अ या कलमाला कडाडून विरोध करीत असल्याचे चित्र या महाआंदोलनात पहावयास मिळाले. चिंबलवासियांच्या आंदोलनातही पुरुषांपेक्षा महिला वर्गच आघाडीवर होता. पाळे-शिरदोनवासीयांच्या आंदोलनाही कृषी व्यवसायात असलेल्या कष्टकरी समाजातील महिलांची संख्या ही लक्षणीय असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आमच्या गावातील सुपीक जमिनींचे आम्ही काँक्रिटच्या जंगलात रुपांतर करू देणार नाही. या सुपीक जमिनी व आमच्या गावातील वृक्षवल्ली व निसर्ग सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रसंगी दुर्गेचे रूप घेऊ, अशा प्रतिक्रिया या महिला व्यक्त करताना दिसत आहेत.


लोकगीतांतून आंदोलकांत
जोश भरण्याचा प्रयत्न

आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांचे मनोरंजन व्हावे व ऊन्हाच्या तडाख्यामुळे येणारा थकवा त्यांना जाणवू नये यासाठी फुगडीगीतांचे व अन्य लोकगीतांचे गायन करण्याबरोबरच खास आंदोलनासाठी रचलेली गीतेही या महिला जोशात सादर करताना दिसत आहेत. यापूर्वी झालेल्या चिंबलवासीयांच्या व आता चालू असलेल्या पाळे-शिरदोनवासीयांच्या आंदोलनाला सर्वाधिक पाठिंबा हा सासष्टी तालुक्यातून मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र, तसे असले तरी दक्षिणकडच्या टोकावरील काणकोण व उत्तरेकडच्या टोकावरील पेडणे तालुक्यातील लोकही या आंदोलनात सहभागी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस व क्रुझ सिल्वा यांच्या मतदारसंघातून आलेल्याबसेसही पोलिसानी अडवल्या होत्या. यावेळी या दोन्ही आमदारांनी आपल्या बसेस सोडल्या नाहीत, तर गंभीर परिणाम होतील असा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी अडवलेल्या बसेस शेवटी सोडण्यात आल्या.

भू-रुपांतराविरुद्ध जनता
एकवटली : पाटकर
सत्ताधारी भाजपतर्फे केल्या जाणाऱ्या भू-रुपांतरांविरूद्ध आता राज्यभरातील जनता एकवटली असून, गावोगावी आंदोलनाच्या मशाली पेटू लागल्याने प्रमोद सावंत सरकारच्या पायाखालील जमीन सरकू लागली आहे, अशी प्रतिक्रिया गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी काल आझाद मैदानावरून पत्रकारांशी बोलताना दिली.