Home बातम्या पोलिसांना आव्हान

पोलिसांना आव्हान

0
मास्तीमळ – काणकोण येथील सौ. विजया पागी या विवाहितेचा झालेला निर्घृण खून ही गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीचे भयावह दर्शन घडवणारी घटना आहे. मासेविक्री करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या एका कष्टकरी महिलेवर अशा प्रकारे अत्याचार करून तिचा जीव घेतला जाणे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे आणि या हीन कृत्याचा अतिशय तीव्र निषेध झाला पाहिजे. मास्तीमळची जनता या खुनाच्या विरोधात पेटून उठली हे प्रशंसनीय आहे आणि जनता अशी जागरूक असेल तरच पोलीस यंत्रणा आणि सत्ताधार्‍यांवर वचक राहील, परंतु पोलिसांच्या तपासकामात आपल्या निदर्शनांमुळे अडथळा येणार नाही आणि कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यातच त्यांची शक्ती खर्च होणार नाही याचे भानही या घडीला जमावाने ठेवायला हवे. गेले तीन – चार दिवस पोलीस स्थानकावर शेकडोच्या संख्येेने जो जमाव गोळा होतो, त्याचा तपासकामाला अडथळाच होत आला आहे. या हत्या प्रकरणात जनतेच्या भावना तीव्र असणे स्वाभाविक आहे, परंतु तिने थोडा संयम राखायला हवा.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घटनेचे राजकारण होणार नाही आणि आपल्याला कोणी वापरून घेणार नाही याची दक्षताही या जनसामान्यांनी घेतली पाहिजे, कारण तापल्या तव्यावर राजकीय पोळी भाजण्यासाठी काही घटक सक्रिय होण्याचीही अशा वेळी शक्यता असते. काल काणकोण बंद करून जनतेने आपल्या ज्या तीव्र भावना व्यक्त केल्या, त्यांचा आदर राखून आणि हा खून हे आव्हान मानून पोलिसांनी आपले बुद्धिकौशल्य पणाला लावले तर आरोपी फार काळ गुंगारा देऊ शकणार नाही. या खुनासंदर्भात नाना तर्कवितर्कांना उधाण आलेले असले तरी अशा खळबळजनक घटना घडतात तेव्हा अफवांचे पीकही उदंड येत असते. त्यातून पोलिसांची दिशाभूल होऊ शकते. त्याचा तपासकामावर परिणाम होऊन ते भरकटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे जनतेनेही अफवांमध्ये भर न टाकता पोलिसांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. काणकोणमधील एखाद्या महिलेच्या जिवाचा घात केला जाण्याची ही तिसरी मोठी घटना आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी २५ सप्टेंबर १९९२ रोजी इंदू देसाई खून प्रकरण घडले होते, तेव्हाही आरोपीचा छडा लागला नव्हता आणि काणकोणवासीय त्या खून प्रकरणाने हादरून गेले होते. त्यानंतर काही काळातच सुलक्षा मराठे या महिलेचा खून झाला आणि त्या प्रकरणात खुनी सापडला. त्यानेच इंदू देसाईचीही हत्या केल्याच्या निष्कर्ष तपास यंत्रणेने काढला, परंतु न्यायालयीन प्रक्रियेत तो दावा टिकाव धरू शकला नाही. सुलक्षा मराठे हत्या प्रकरणात त्या आरोपीला जन्मठेप झाली, परंतु चौदा वर्षांची जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्या आरोपीची सुटका झाली आहे आणि सध्या सावंतवाडीत एका हॉटेलमध्ये तो काम करतो अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. विजया पागीच्या हत्येमागे चोरी हा उद्देश नसून लैंगिक आसक्तीच या हत्येला कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसते. त्यामुळे यामागे कोणी स्थानिक आहेत, बिगरगोमंतकीय आहेत की कोणी वांड विद्यार्थी आहेत, हे शोधण्याचे आव्हान आजच्या घडीस पोलिसांवर आहे. जनता अस्वस्थ आहे, त्याला काणकोण इमारत दुर्घटनेनंतरच्या घटनाक्रमाची पार्श्वभूमी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या तपासकामाबाबत पोलिसांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला तर सध्याचे तणावाचे वातावरण निवळेल. या हत्या प्रकरणात आरोपीने आपला कोणताही पुरावा मागे राहू दिलेला नाही, परंतु सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले अनेक चांगले पोलीस अधिकारी गोव्यातही आहेत. त्यांच्या मदतीने आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली या आव्हानात्मक खून प्रकरणाचा उलगडा होईल अशी अपेक्षा आहे. गोव्यात अलीकडे गुन्हेगारीने पुन्हा उचल खाल्ली आहे. सातत्याने सुरू असलेल्या घरफोड्या, खून, मारामार्‍या या सार्‍या घटनांकडे डोळेझाक करून राज्यात सारे आलबेल आहे असे मानणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करण्यासारखे ठरेल. पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबतच सध्या प्रश्नचिन्हे निर्माण झालेली आहेत. तपासकामाबाबत जी पारदर्शकता हवी ती नसल्याने जनतेमध्येही पोलिसांविषयी अविश्वासाचे वातावरण वाढते आहे. हे चित्र बदलण्याची गरज नितांत गरज आज भासते आहे.