पोर्तुगाल पासपोर्टधारकांना ‘सीएए’ची भीती नाही

0
156

>> केंद्रिय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे मडगावात आश्‍वासन

भारताच्या शेजारी देशातील पाकिस्तान, बांगला देश व अफगाणिस्तानमधील भारतीय धार्मिक अल्पसंख्याक नागरिकांचा छळ होत आहे. ते भारतात परत आल्यास सर्व तर्‍हेची सुरक्षा देण्याची तरतूद नागरिक सुधारणा कायद्यात करण्यात आली आहे. त्याचा भारतातील जनतेवर कोणताच अनिष्ट परिणाम होणार नाही. गोव्यातील पोर्तुगीज पासपोर्टधारकांना कोणताच त्रास होणार नाही, असे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ख्रिश्‍चन, पारशी, शीख या अल्पसंख्याकांचा छळ होत आहे. हे शरणार्थी होऊन आल्यास त्यांना पूर्ण संरक्षण दिले जाईल. हा कायदाच त्यांना नवे जीवन, सुरक्षा देणारा आहे. लाखो लोकांना सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते ते सर्व भारतीय आहेत. या कायद्यामुळे भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांनी भिण्याचे कारण नाही. आता त्यांची सुरक्षा राखण्यात केंद्र व राज्य सरकारे कटिबद्द आहेत. असे सांगून मंत्री गोयल म्हणाले की, २०१४ पर्यंत भारतात परतलेल्यांना नागरित्व मिळाले आहे. मोदी सरकारने या पाच वर्षात ५०० लोकांना नागरित्व दिले आहे. २०१५ नंतर भारतात आलेल्याना भारतीय नागरिकांना नागरिकत्वासाठी अर्ज करावे लागतील, असेही गोयल यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेनंतर रेल्वेमंत्र्यांनी मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकाला भेट देऊन, सुरक्षेची पहाणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मंत्री मिलिंद नाईक, भाजपचे प्रवक्ते दामू नाईक उपस्थित होते.