सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या लिक झालेल्या अनुक्रमे गणित व अर्थशास्त्र या विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. सीबीएसई मंडळाने या अनुषंगाने परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे तसेच कारवाईचे आश्वासन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधकांच्या जोरदार टिकेनंतर दिले आहे.
वरील विषयांचे पेपर लिक झाल्याविषयी तक्रारी आल्यानंतर फेरपरीक्षांचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या फेरपरीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. येत्या आठवड्यात या तारखा जाहीर केल्या जातील. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सीबीएसई मंडळाकडून सांगण्यात आले. याविषयीची माहिती मंडळाच्या वेबसाईटवर देण्यात येणार आहे.
१२ वीच्या अर्थशास्त्राचा पेपर २७ मार्च रोजी घेण्यात आला होता. तो काही ठिकाणी लिक झाला होता. तसाच प्रकार दहावीच्या गणित विषयाच्या पेपरबाबत घडल्यानंतर तक्रारी दाखल झाल्या होत्या. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षांना ११ लाख ८६ हजार विद्यार्थी तर दहावीच्या परीक्षांना १६ लाख ३८ हजार विद्यार्थी देशभरातून बसले आहेत.