सांताक्रूझ व सांतआंद्रेवासियांचा ६ एप्रिलचा मोर्चा निश्‍चित

0
79

>> ‘पीडीएविरोधी गोंयकार’ची स्थापना

सांताक्रूझ व सांतआंद्रे ग्रेटर पणजी पीडीएतून वगळण्याबाबत नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी कोणतीच ठोस पावले उचलली नसल्याने या पीडीएला विरोध करणार्‍यांनी ‘पीडीएविरोधी गोंयकार’ अशी एक आघाडी स्थापन केली असून ह्या आघाडीच्या झेंड्याखाली येत्या ६ एप्रिल रोजी पणजीत ६ हजार लोकांचा एक मोठा मोर्चा आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पीडीएविरोधी गोंयकार’ची निमंत्रक आर्थुर डिसोझा यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

‘पीडीएविरोधी गोंयकार’ने आपला पीडीएविरोधी लढा चालू ठेवण्यासाठी गावागावात समन्वय समित्या स्थापन केलेल्या आहेत. सांतआंद्रे व सांताक्रूझ ग्रेटर पणजी पीडीएतून वगळण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थ करीत असतानाही सरकार त्यासाठी ठोस पावले उचलीत नसल्याने आम्हाला आता मोठा लढा द्यावा लागेल हे स्पष्ट झाले असून त्यासाठीच ‘पीडीएविरोधी गोंयकार’ ह्या आघाडीची स्थापना करण्यात आली असल्याचे डिसोझा म्हणाले.

मोर्चा शांततापूर्णरित्या
६ एप्रिल रोजीचा मोर्चा हा मोठा असला तरी हा मोर्चा अत्यंत शांततापूर्ण असा असेल, असे यावेळी बोलताना रुडॉल्फ फर्नांडिस यांनी सांगितले.
६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजल्यापासून मोर्चास प्रारंभ होणार असून ३ वाजता पाटो येथील धेंपो टावर्सकडून मोर्चास सुरवात होईल. मोर्चा तेथून आझाद मैदानावर येणार असून ३.३० वाजता आझाद मैदानावर सभा होईल. आमचा मोर्चा कसा असेल याची माहिती पोलीस अधीक्षकाची भेट घेऊन त्यांना देण्यात येणार असल्याचेही डिसोझा यानी सांगितले.

सरदेसाईंचे आश्‍वासन
ठोस नाही
मंत्री विजय सरदेसाई यानी तीन पंचायत क्षेत्रांना ग्रेटर पणजी पीडीएतून वगळल्याबाबत दिलेले आश्‍वासनही ठोस असे नाही. त्याबाबत केवळ त्यानी तोंडी आश्‍वासन दिलेले आहे. अशी तोंडी आश्‍वासने देऊन काहीही होत नसते. प्रत्यक्ष कृती होणे अथवा कृती करण्याचे लेखी आश्‍वासन देणे गरजेचे आहे, असे यावेळी आर्थुर डिसोझा व रुडॉल्फ फर्नांडिस यानी स्पष्ट केले.