पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल रविवार दि. ३० रोजी ट्रक आणि इलेक्ट्रिक स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातामध्ये सावंतवाडी येथील विजय रमाकांत गावकर (४८) यांचा जागीच मृत्यू झाला.
पेडणे न्हायबाग पुलाजवळील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर मालवाहून ट्रक (एनएल ०१ एई ६३३१)आणि इलेक्ट्रिक दुचाकी (एमएच ०७ एक्यू ०३९५) ही दोन्ही वाहने पेडणेमार्गे बांदा येथे जात होती. त्यावेळी मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. यात विजय गावकर यांचा जागीचमृत्यू झाला. पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रकचालक दीपक दुबे उत्तर प्रदेश याला अटक केली.
अपघातांचे सत्र
पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. मागच्या महिन्यात तोरसे सरकारी विद्यालयासमोर ट्रक आणि चारचाकी यांच्यात अपघात होऊन मुंबई येथील आई व बालक ठार झाले होते. त्यानंतर आठ दिवसापूर्वी इलेक्ट्रिक स्कूटर आणि एक ट्रक यांच्यातील अपघातात नवविवाहित वधू जागीच ठार झाली होती. आतापर्यंत या वर्षात किमान २० जणांचे बळी या रस्त्याने घेतलेले आहे.