पेट्रोलवरील ‘व्हॅट’मध्ये ५% कपात

0
97

>>वाहनचालकांना सरकारचा दिलासा

 

पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याने सरकारने जारी केलेल्या एका मूल्यवर्धित आदेशाद्वारे पेट्रोलवर असलेला कर २० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर आणला आहे. पाच टक्के व्हॅट कमी केल्याने राज्यात प्रती लीटर पेट्रोलचा दर सुमारे ५९ रु. ६० पैसे इतका झाला आहे.
पेट्रोलच्या दरात अधिक वाढ झाल्यास मूल्यवर्धित कर कमी करण्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काही दिवसांपूर्वी संकेत दिले होते. कालपासून पेट्रोलच्या दरात प्रती लीटर २ रु. ५८ पैसे तर डिझेलच्या दरात २ रु. ५६ पैसे वाढ झाली आहे.
२०१२मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने व्हॅट कमी केला होता. त्यामुळे अन्य राज्यांतील पेट्रोल दराच्या तुलनेत येथील पेट्रोल आठ ते नऊ रुपये स्वस्त झाले होते. त्यामुळे शेजारच्या कर्नाटक व महाराष्ट्र सीमा भागातील वाहन चालक गोव्यात येऊन इंधन भरून घेत होते. व्हॅट कमी केल्याने राज्याच्या महसूलावर बराच परिणाम झाला होता. दरम्यानच्या काळात पेट्रोलचे दर खाली उतरले. त्यामुळे सरकारने कमी केलेला व्हॅट पुन्हा लागू केला होता. आता पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने जनतेच्या रोषावर उपाय म्हणून व्हॅट २० टक्क्यांवरून पुन्हा १५ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वाहन चालकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून सरकारने व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.