कोकण रेल्वेला १२० कोटींचा नफा

0
83

>>चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची माहिती

 

गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकण रेल्वेने उल्लेखनीय अशी प्रगती केलेली असून महामंडळाला १२० कोटी रु.चा निव्वळ नफा झाला असल्याचे कोंकण रेल्वे महामंडळाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. माल वाहतूकीत वाढ केल्यास महामंडळाला आणखी नफा होऊ शकतो व त्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत. या घडीला महामंडळाची ५५ टक्के वाहतूक ही प्रवासी व ४५ टक्के मालाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वेने जे कर्ज घेतले होते त्यापैक १५०० कोटींचे कर्ज हे अजून फेडायचे असून २०२४ सालापर्यंत ते फेडावे लागणार असल्याचे ते म्हणाले. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी चालू आर्थिक वर्षापासून ई निविदा काढण्यात येणार आहेत.
मार्गाचे दुहेरीकरण
कोकण रेल्वेला गोव्यातील मार्गाचे दुहेरीकरण करण्यास मान्यता मिळाल्यानंतर दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुहेरीकरणासाठीचे जमीन संपादन झालेले आहे. त्यासाठीचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.
दुहेरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार असून प्रथम वेर्णे ते माजोर्डा, नंतर मडगाव ते बाळ्ळी व त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य ठिकाणी हे काम हाती घेण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रातील रोहा ते वीर या दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू आहे, असे गुप्ता यांनी सांगितले. १५०० कोटींचा महसूल
कोकण रेल्वेला किती महसूल मिळतो असे विचारले असता सध्या १५०० कोटी रु. एवढा महसूल मिळत असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. कोकण रेल्वेच्या गोव्यातील मार्गावर विद्युतीकरण करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी नमूद केले.
मडगाव स्टेशनची साफसफाई
स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून मडगाव रेल्वेस्थानकाच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात येणार आहे. सात दिवस सात मोहिम या योजनेनुसार २६ मे हा स्वच्छता दिन, २७ मे सत्कार दिन, २८ मे सेवा दिन, २९ मे सतर्कता दिन, ३१ मे संयोजक दिन व १ जून संचार दिन घोषित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. गोव्यात मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याचा कोंकण रेल्वेचा विचार आहे काय, असे पत्रकारांनी विचारले असता मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय हा राज्य सरकारला घ्यावा लागतो. राज्य सरकारला हवी असेल तर मेट्रो सेवा उभारण्याच्या कामी आवश्यक ते सहकार्य कोकण रेल्वे करू शकते. पण त्यासाठीचा निधी मात्र राज्य सरकारलाच उभारावा लागणार असल्याचे ते म्हणाले.
स्काय बस प्रकल्प रद्द
स्काय बस प्रकल्प हा खूप खर्चिक व न परवडण्यासारखा असल्याचे दिसून आल्याने तो रद्द करण्याचा निर्णय कोंकण रेल्वे महामंडळाने घेतल्याचे गुप्ता यांनी सांगितले. प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची असून शून्य अपघात हे उद्दिष्टही महामंडळाने ठेवल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेला कोकण रेल्वेचे विभागीय अधिकारी हसिम सुलेमान हेही हजर होते.