पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहरच

0
299

>> एनआयएच्या आरोपपत्रात हल्ल्याच्या कटाचा तपशील उघड

गेल्यावर्षी फेब्रुवारीत झालेल्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश ए महंमदचा पाकिस्तानस्थित म्होरक्या मसूद अजहर हाच असून हल्ल्याच्या आधी, हल्ल्याच्या वेळी नंतर तो प्रत्यक्षात हा हल्ला घडवणार्‍या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने काल सादर केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. मौलाना मसूद अजहरचे दोन भाऊ रौफ अझगर व मौलाना महंमद अम्मार यांनाही या हल्ल्यातील आरोपी करण्यात आले आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने काल या हल्ल्यासंदर्भातील तब्बल १३ हजार पानी आरोपपत्र जम्मूतील विशेष न्यायालयास सादर केले. मौलाना मसूद अजहरचा पुतण्या व आयसी ८१४ विमान अपहरणकांडातील दहशतवादी इब्राहिम अजहर याचा मुलगा महंमद उमर फारूख हा या हल्ल्यात सामील होता. पाकिस्तानातील म्होरक्यांसह एकूण एकोणिस दहशतवाद्यांनी या कटामध्ये सहभाग घेतला असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. फारुख हा पाकिस्तानातील जैशच्या नेतृत्वाच्या सतत संपर्कात होता असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

अठरा महिन्यांनी आरोपपत्र
गेल्या अठरा महिन्यांच्या तपासाअंती हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींची कॉल रेकॉर्डिंग, व्हॉटस्‌ऍप चॅटस्, छायाचित्रे व व्हिडिओ आरोपीच्या फोनमधून मिळाले असल्याचेही एनआयएने नमूद केले आहे.

पुलवामातील स्फोटासाठी दोनशे किलो स्फोटकांचा वापर झाला. त्यात ३५ किलो आरडीएक्स होते, जे पाकिस्तानातून आणले होते, तर इतर स्फोटके स्थानिक पातळीवर मिळवण्यात आली असेही आरोपपत्रात म्हटले आहे. या कटातील म्होरक्या फारुक हा एप्रिल २०१८ मध्ये भारतात आला आणि त्यानेच हल्ल्यात वापरल्या गेलेल्या स्फोटकांची जमवाजमव केली असे आरोपपत्रात म्हटले आहे.

६ फेब्रुवारीचा बेत फसला
दहशतवादी ६ फेब्रुवारी २०१९ रोजीच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला चढवणार होते, परंतु हिमवृष्टी झाल्याने जम्मू – श्रीनगर मार्ग बंद झाल्याने तेव्हा त्यांना तो बेत तडीस नेता आला नाही, असा दावाही आरोपपत्रात करण्यात आला आहे.
२९ मार्च रोजी झालेल्या स्फोटात कामरान याच्यासह तो मारला गेला. या हल्ल्यामध्ये इस्माईल सैफुल्ला हाही सामील होता. तो हल्ल्याच्या काही दिवस आधी पाकिस्तानातून सीमा पार करून भारतात घुसला होता. तो सध्या फरारी आहे. समीर दार हाही कटात सामील होता. फारुक व कामरान हे स्फोटात मारले गेले तेव्हा तो त्यांच्यासमवेत होता, पण पळून जाण्यात यशस्वी ठरला असेही आरोपपत्रात म्हटले आहे.

१४ फेब्रुवारीला शकीर बशीर या दुकानदाराने लष्कराच्या रस्ता खुला करणार्‍या पथकाला पाहिले व त्याने फारूक याला त्याची माहिती दिली. त्यानंतर फारुक याने पुढची कार्यवाही केली. स्फोटात वापरला गेलेला बॉम्बची देखील बशीरच्या घरीच जुळणी केली गेली असे एनआयएनने म्हटले आहे. आदिल अहमद दार या स्थानिक फिदाईन दहशतवाद्याने स्वतः स्फोटके व बॉम्ब असलेले वाहन सीआरपीएफच्या बसवर नेऊन आदळवले. कोणत्या बसमध्ये सर्वांत जास्त जवान बसले आहेत हे पाहून त्याने हा हल्ला चढवला. पुलवामा हल्ल्यानंतर दुसर्‍या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचीही योजना होती, परंतु बालाकोटवरील कारवाईनंतर तो बेत सोडून देण्यात आला असेही आरोपपत्रात म्हटले आहे.

कसा घडवला गेला पुलवामा हल्ला?
मुख्य सूत्रधार ः मौलाना मसुद अजहर, जैश ए महंमदचा पाकिस्तानस्थित म्होरक्या. त्याचा भाऊ रौफ अझगर व मौलाना महंमद अमार.

र्े प्रत्यक्ष हल्ला घडवणारा ः मसुद अजहरचा पुतण्या उमर फारुक. त्याने व इस्माईल सैफुल्ला याने २०१८ मध्ये जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानातून भारतात घुसखोरी केली. त्यासाठी अमवास्येच्या रात्री आंतरराष्ट्रीय सीमेवरील तारा कापल्या. आशिक अहमद नेंगरू व महंमद इक्बाल राथर यांनी त्यांना काश्मीर खोर्‍यात पोहोचवले. ते नंतर पाकिस्तानात पळून गेल्याचा संशय आहे.

र्े हल्ल्याची पूर्वतयारी ः हल्ल्याची पूर्वतयारी १० महिन्यांपासून सुरू होती. शकीर बशीर याने उमर फारुकला मदत केली. बशीरच्याच घरी बॉम्ब बनवला गेला. त्याने इतर दहशतवाद्यांच्या मदतीने स्फोटके गोळा केली.

र्े स्फोटके कुठून मिळवली?ः ३५ किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले. जिलेटिन कांड्या स्थानिक पातळीवर गोळा केल्या गेल्या. अमोनियम नायट्रेट स्थानिक खत विक्रेत्याकडून मिळवले गेले. वैसुल इस्लाम या सहआरोपीने ई कॉमर्स संकेतस्थळावरून ऍल्युमिनियम पावडर खरेदी केली.

र्े हल्ल्याचा पहिला प्रयत्न असफल ः ५ फेब्रुवारीच्या रात्री आदिल अहमद दार याने आईडी बनवला. ६ फेब्रुवारीला हल्ला चढवायचा त्यांचा बेत होता, पण हिमवृष्टीमुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने त्यांना बेत पुढे ढकलावा लागला. अखेर १४ फेब्रुवारीला आदिल अहमद दार या स्थानिक फिदाईन दहशतवाद्याने स्फोटके भरलेले वाहन सीआरपीएफच्या वाहनावर आदळवून प्रत्यक्ष हल्ला चढवला.

र्े प्रत्यक्ष हल्ला कसा झाला?ः समीर दार, उमर फारुक व शकीर बशीर हे हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी होते. शकीरने स्फोटके भरलेले वाहन हल्ल्याच्या ठिकाणापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत स्वतः चालवून नेले व नंतर ते आदिल दार या फिदाईनच्या हाती सोपवले. आदिलने ते सीआरपीएफच्या बसवर आदळवले, ज्या स्फोटात ४० जवान शहीद झाले.