खणखणीत इशारा

0
432


चीनने गेल्या मे महिन्यापासून भारतीय प्रदेशामध्ये जी घुसखोरी चालवली आहे, ती संपुष्टात आणण्यासाठी उभय देशांत चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत, परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही, तर भारत लष्करी कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही असा इशारा नुकताच तिन्ही सेनादलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला आहे. तिन्ही सेनादलांच्या प्रमुख पदावरील व्यक्तीने अशा प्रकारचा सुस्पष्ट इशारा देण्याची ही घटना भारताच्या बदललेल्या लष्करी नीतीचीच निदर्शक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत आता पूर्वीसारखे परराष्ट्रांचे घाव सोसणार नाही, तर ठोशास ठोसा देईल असेच जणू रावत यांना या इशार्‍यातून सूचित करायचे आहे.
खरे तर एखाद्या देशाशी वाटाघाटी सुरू असताना, चर्चेच्या फेर्‍या चालल्या असताना अशा प्रकारचा इशारा देणे शिष्टसंमत नाही, कारण त्याचा परिणाम अर्थातच चाललेल्या वाटाघाटींवर होणे स्वाभाविक ठरते, परंतु भारत आता चीनने घुसखोरीच्या माघारीसंदर्भात चालवलेल्या वेळकाढूपणाला सहन करण्याच्या मनःस्थितीत नाही, हेच जनरल रावत यांच्या या इशार्‍यातून स्पष्ट होते आहे.
गेल्या मे महिन्यापासून चीनने भारताच्या लडाखमध्ये कुरापती काढायला सुरूवात केली. त्यानंतर १५ जून रोजी गलवान खोर्‍यामध्ये चीनच्या सैनिकांनी आपल्या वीस निःशस्त्र जवानांची निर्दयपणे अमानुषरीत्या हत्या केली. त्यानंतर भारताने चीनवर व्यापारी निर्बंध घालून दडपण आणायला सुरूवात करताच एक जुलैपासून माघारीचा आव चीनने आणला. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी चीनच्या विदेशमंत्र्यांची दोन तास फोनवर हजेरी घेतल्यानंतर चीनकडून गलवान खोर्‍यातून माघार घेतली गेली, परंतु अन्यत्र केलेल्या घुसखोरीतून चिनी सैनिक मागे हटलेले नाहीत. उभय देशांमध्ये सातत्याने चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत, परंतु त्यातून काही निष्पन्न होत नाही. कॉर्प्स कमांडर पातळीवरील चर्चेच्या पाच फेर्‍या झाल्या, खास प्रतिनिधींपासून विदेश मंत्र्यांपर्यंत सर्व पातळ्यांवर चीनला समजावण्याचा प्रयत्न झाला, परंतु तरीही चीन मागे हटलेला नाही. सध्या चर्चेची नवी फेरी सुरू होत आहे, परंतु तरीही चीनने आडमुठी भूमिका कायम ठेवल्यास लष्करी विकल्प हाताळण्यास भारत मागेपुढे पाहणार नाही हा सूचक संदेश जनरल रावत यांनी दिलेला आहे.
चीनने दुसरीकडे पाकिस्तानशी गळाभेटी चालवल्या आहेत. पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी हे नुकतेच चीन भेटीवर जाऊन आले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पाकिस्तान भेटीला कसे उत्सुक आहेत, ते त्यांनी आपल्या देशात परतल्यावर सांगितले. त्याने हर्षभरित झालेल्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी आघाडीच्या चिनी कंपन्यांना पाकिस्तानात कार्यालये उघडण्याचे आमंत्रण दिले आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे चीन भारताशी मात्र नियंत्रण रेषेवर खेळी खेळतो आहे. पँगॉंग सरोवराच्या भूशिरांवरून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अजूनही माघार घेतलेली नाही. देपलांग पठारावर अजूनही चीनने मोर्चा सांभाळलेला आहे. गोग्रा हॉटस्प्रिंगमधूनही चीन मागे हटलेला नाही. गलवानमधून माघारीचा देखावा करणारा चीन इतरत्र ठाण मांडून बसला आहे. भारताच्या संयमाची परीक्षा पाहतो आहे. संयमाची अशा प्रकारची परीक्षा पाहू नका, कारण आमचा संयम सुटला तर आम्ही शस्त्रे हाती घेऊ असेच जणू जनरल रावत यांचा इशारा चीनला सांगतो आहे. पाकिस्तान वर्षानुवर्षे भारताची कुरापत काढत आला आणि भारत ती मुकाट सहन करत आला. परंतु जेव्हा भारताच्या संयमाचा बांध फुटला तेव्हा सर्जिकल स्ट्राईक केले गेले, बालाकोट कारवाई झाली आणि पाकिस्तानची पाचावर धारण बसली. चीन भारताच्या तुलनेत अनेक पटींनी लष्करी आणि अन्य दृष्टींनी सामर्थ्यवान आहे, परंतु विद्यमान जागतिक परिस्थिती लक्षात घेता भारतही एकाकी नाही. त्याचाच फायदा घेत भारताने चीनला प्रत्युत्तराचा खणखणीत इशारा दिलेला आहे. यातून शहाणपणाने चीनने माघार घेतली तर ठीक, नाही तर गलवानच्या शहिदांच्या बलिदानाचे खमके प्रत्युत्तर दिल्याखेरीज भारत स्वस्थ राहणार नाही हे उघड आहे. या शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असा इशारा पंतप्रधानांनी यापूर्वीच दिलेला आहे. मोदी सरकारची आजवरची आक्रमक रणनीती लक्षात घेता जनरल रावत यांचा ताजा इशारा हा नुसताच बोलाची कढी आणि बोलाचा भात नक्कीच ठरणार नाही! लडाखची सीमा लवकरच धगधगू लागली तर नवल नसेल!