कोरोनाने घेतले राज्यात आणखी ९ बळी

0
335

>> राज्यातील मृत्यूसंख्या १५७ वर

राज्यात कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. काल दिवसभरात आणखी ९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्यातील कोरोना बळींची संख्या १५७ झाली आहे. नवे ३९२ रुग्ण आढळून आले असून सध्याची रुग्णसंख्या ३१४९ आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १५,५३० एवढी झाली आहे. कोरोना बाधित ३१५ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११,२२४ एवढी झाली आहे.

धारबांदोडा येथील ५२ वर्षाचा पुरुष रुग्ण, मांगूर हिल येथील ४९ वर्षाच्या महिला रुग्ण, पेडणे येथील ५२ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी निधन झाले. पेडणे येथील ७० वर्षाच्या पुरुष रुग्ण, मेरशी येथील ७३ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे गोमेकॉमध्ये काल निधन झाले आहे. बोरी येथील ७३ वर्ष पुरुष रुग्ण, चांदोर येथील ६४ वर्ष पुरुष रुग्ण, मांगूर हिल वास्को येथील ५० वर्षाच्या रुग्णांचे मडगाव येथील कोविड इस्पितळात सोमवारी निधन झाले. मालभाट – मडगाव येथील ७२ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे कोविड इस्पितळात काल निधन झाले.

राज्यात श्रीगणेश चतुर्थीच्या काळात स्वॅबची कमी प्रमाणात झालेली चाचणी पुन्हा एकदा वाढू लागली आहे. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत २३११ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत ४४६ स्वॅबच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. आरोग्य खात्याने २४६३ स्वॅबचे नमुने कोविड प्रयोगशाळेत पाठविले आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी १८८ जणांनी होम आयझोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.

श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा

केंद्रीय आयुषमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत मंगळवारी सुधारणा दिसून आल्याने त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या इस्पितळात हलविण्याचा विचार तूर्त स्थगित करण्यात आला आहे. दिल्लीहून दाखल झालेल्या ‘एम्स’च्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला.
सोमवारी नाईक यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण खाली गेल्याने त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे तातडीने एम्सचे पथक गोव्यात दाखल झाले होते. त्यात डॉ. राजेश्वरी व डॉ. अनंत मोहन यांचा समावेश होता. त्यांनी केलेल्या उपचारांनंतर नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. त्यामुळे त्यांना दिल्लीला पुढील उपचारार्थ नेण्याचा विचार बदलण्यात आला. नाईक यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा दिसून आल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.