पुरुषत्वासाठी कपिकच्छू बी

0
11
  • डॉ. मनाली महेश पवार

अगदी सामान्य वाटणारी शिम्बी कुळातील ही वनस्पती. खाजकुयलीचा औषधी उपयोग असू शकतो का, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल. पण ही साधी नगण्य वाटणारी दुर्लक्षित वेल मूलबाळ नसलेल्या दांपत्यांसाठी वरदान आहे. ही एक वृष्य रसायन वनस्पती आहे.

पूर्वी खोडकर मुलं आपला राग व्यक्त करायला म्हणा किंवा नुसती मजा घ्यायला एक प्रकारच्या पावडरचा वापर करीत. ती पावडर शरीराच्या ज्या भागाला लागे तिथे नुसती खाज सुटे. मग त्याला माकडासारखे खाजवताना पाहून मजा यायची. काहींना आपला बदला पूर्ण झाल्याचा आनंद मिळायचा. ही मजा, हा बदला कधीच जीवघेणा नसायचा. काही मर्यादित काळापुरती खाज यायची व जास्तीत जास्त थोडे लालसर चट्टे यायचे. पूर्वीच्या सिनेमातही अशाच खोड्या दाखवत. आज ज्या खोड्या होतात त्या जीवघेण्या होत आहेत. असो. पण ही पावडर कोणती माहीत आहे का?
‘खाजकुयली’ हे त्या पावडरचे नाव आहे. नावातच खाज उत्पन्न करणारे हे समजते. याला आत्मगुप्त, मार्कटी, स्वयंगुप्त, रोमालू, कण्डुरा अशी संस्कृत नावे आहेत व ‘कपिकच्छू’ या संस्कृत नावाने ही वनस्पती ओळखली जाते.

कपिकच्छू ः वानराच्या अंगावरील केसांप्रमाणे फळावरील लव दिसते.
आत्मगुप्ता ः रोमामुळे संरक्षण करणारी.
मर्कटी ः माकडाप्रमाणे रोम असलेली.
कण्डुरा ः खाज उत्पन्न करणारी.
अगदी सामान्य वाटणारी शिम्बी कुळातील ही वनस्पती. खाजकुयलीचा औषधी उपयोग असू शकतो का, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल. पण ही साधी नगण्य वाटणारी दुर्लक्षित वेल मूलबाळ नसलेल्या दांपत्यांसाठी वरदान आहे. ही एक वृष्य रसायन वनस्पती आहे.

ही वेल जंगलात विविध मोठ्या वृक्षांच्या आधारे वाढते. ही वर्षायू वेल आहे. याची पाने 7 ते 13 सें.मी. लांब त्रिदलात उगवतात. पानांवर बारीक लव असते. फुले 15 ते 30 सें.मी. लांब, मंजिरी स्वरूपातील, वांगी रंगाची, निळी असतात. याची फळे म्हणजे शेंगा. त्या 5 ते 10 सें.मी. रुंद, दोन कड्या वाकड्या असतात व शेंगेवर दाट लव असते. या लवीचा अंगाला स्पर्श झाला असता तीव्र खाज, आग व सुज उत्पन्न होते. प्रत्येक शेंगेत 5 ते 6 धुरकट व चपट्या बिया असतात. बीजमज्जा पांढरी असते. नोव्हेंबरमध्ये फुले व जानेवारीमध्ये फळे येतात.

बीज, रोम (लव) व मूळ ही औषधस्वरूपात वापरतात. बीजमज्जेत एक गडद, धुरकट रंगाचे दाट तेल असते. बिजात प्रोटिन्स, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, गंधक, मॅगनिज इ. खनिज पदार्थ असतात.

ही वनस्पती चवीने गोड व कडू आहे. गुणाने गुरू (जड), स्निग्ध आहे. मधुर, गुरू, स्निग्ध असल्याने वातघ्न आहे. लघुउद्योग करणारे प्रचंड खोल व विस्तीर्ण खड्ड्यात खाजकुयलीच्या शेंगा टाकतात. काही काळाने त्या आपोआप फुटतात. मग हाताला खांद्यापर्यंत मोजे घालून त्यातील बिया गोळा केल्या जातात. ह्या बिया औषधी रूपात वापरतात.

प्रमुख कार्य व उपयोग
फलरोम कृमिघ्न तर बीजचूर्ण वृष्य आणि मूळचूर्ण स्त्रियांमधील कामवासनावर्धक आहे.

  • कुसे (रोम) उत्तम कृमिघ्न आहेत. गोल जंत मारण्यास शेंगेवरचे केस मधातून देतात. एकवेळ एका शेंगेवरची कुसे खरडून दिल्यास पुरेशी होतात. दुसऱ्या दिवशी जुलाब होण्यासाठी औषध घ्यावे. कृमी मरून पडतात. 125 ते 500 मि.ग्रॅ. फलरोम गूळ, मध किंवा लोण्यात मिसळून घ्यावे, जेणेकरून घशात टोचून खाज येणार नाही.
  • ज्वरात भ्रम झाला असल्यास किंवा अशक्तपणात मुळाचा काढा द्यावा.
  • महामारीत मुळाचा फांट मधाबरोबर द्यावा.
  • मुळाच्या काढ्याने लघवीचे प्रमाण खूप वाढते, म्हणून असा काढा मूत्रपिंडाच्या रोगात देतात. मूळ मुत्रल असल्याने मूत्रकृच्छ आणि वृक्कारोगात मूत्रोत्पतीसाठी घ्यावे.

कपिकच्छूचा काढा पक्षाघात, मन्यामांस व अर्दित्त यांवर उपयोगी आहे.

  • सामान्य दौर्बल्य व कृशतेत बीज उत्तम उपयोगी आहे.
  • ही वनस्पती पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते.
  • खाज, गजकर्ण आणि इसब यांसारख्या त्वचेच्या समस्यांवर खाजकुयलीचा वापर केला जातो.
  • खाजकुयलीमध्ये न्यूरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म आहेत, जे नैराश्य आणि तणाव कमी करण्यास मदत करतात.
  • मधुररसविपाकी व शीतवीर्य असल्याने स्तन्य वाढवण्यास उपयुक्त ठरते. तिक्तरसाने रसप्रदीपन होऊन स्तन्याच्या निर्मितीस चालना मिळते, म्हणून स्तन्यक्षयात कपिकच्छू बीज द्यावे.
  • तीव्र कंड (खाज) उत्पन्न करणारी म्हणून सर्वसाधारणपणे परिचित असलेली खाजकुयली वास्तविक खूप उत्तम शक्तिवर्धक आहे.
  • कवच बियांचा वापर वाजीकरण म्हणून केला जातो.
  • कवच बीज म्हणजेच कपिकच्छूच्या बिया उत्तम पौष्टिक द्रव्य आहेत. विशेषतः मांसधातू, शुक्रधातूची ताकद वाढवण्यासाठी या बियांचा वापर करतात.
  • बिजांचा उपयोग शुक्रक्षय व क्लैष्यात करावा.
  • कपिकच्छू चूर्ण व गव्हाचे पीठ शिजवून गार करून त्यात तूप व मध घालून ते खावे व त्यावर दूध प्यावे. शुक्रवृद्धी होऊन मैथुनसामर्थ्य वाढते.
  • शुक्रक्षयामुळे डोकेदुखी, नेत्रशूल, अंगदुखी ही लक्षणे उत्पन्न झाल्यास कपिकच्छूचूर्ण घृत वापरावे.
  • कविकच्छूचे मूळ हे आर्तवजनन आणि योनिसंकोचक आहे.
  • मुळाचा उपयोग कष्टार्तवात करावा.
  • कपिकच्छू मुळाचे चूर्ण तूप, मध व साखरेबरोबर सेवन केल्याने स्त्रियांमध्ये कामवासना वाढते.
  • कपिकच्छूच्या मुळाच्या काढ्याने योनिधावन केले असता, तसेच काढ्यात भिजवलेला पिचू योनिमार्गात ठेवला असता योनीचे शिथिलत्व कमी व्हायला मदत होते.
  • कवच-बीचा (कपिकच्छू बीज) खरा वापर जगभर ‘पुरुषत्व गमावलेली मंडळी’ मोठ्या श्रद्धेने करतात व त्याचा शंभर टक्के लाभही मिळतो.