राज्यात जानेवारी ते जून 2025 या सहा महिन्यांच्या काळात पर्यटकांच्या संख्येत 8.4 टक्के वाढ नोंद झाली. गोवा ते गॅटविक दरम्यान थेट विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल केले. राज्य पातळीवरील पारंपारिक सांजाव उत्सवासाठी कायमस्वरूपी जागा म्हणून शिवोली गावाची निवड करण्यात आली आहे. एकादश तीर्थ उपक्रमांतर्गत गोव्यातील 11 मंदिरांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यांना तीन आधात्मिक मार्गामध्ये विभागण्यात आले आहे. या मार्गावर जीटीडीसीच्या बसेस उपलब्ध केल्या जाणार आहेत, असेही मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. लोक, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या तीन मुख्य स्तंभावर आधारित पुनरूज्जीवित पर्यटन सुरू करणारे गोवा हे भारतातील पहिले राज्य आहे. ‘समुद्रकिनाऱ्यांपलीकडे गोवा’ हा उपक्रम या धोरणामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. शाश्वत विकास सुनिश्चित करताना संख्येपेक्षा दर्जेदार पर्यटकांना आकर्षित करणे हे ध्येय आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.