पुरुमेंताची लगबग…

0
48
  • – गिरिजा मुरगोडी

निसर्गाच्या बदलत्या रूपाबरोबरच पुरुमेंताच्या फेस्ताचं वातावरण तयार होऊ लागलेलं आहे. गावोगावी या फेस्ताची गडबड सुरू झालेली आहे. आणि त्या ठिकाणी भेट देऊन श्रद्धा अर्पण करण्याबरोबरच बेगमीचे कोणकोणते पदार्थ आणि नियोजनानुसार इतर कोणकोणत्या वस्तूंची खरेदी करायची याबद्दलचे मनसुबेही रचले जाऊ लागले आहेत…

पावसाळा जवळ येऊ लागला की आपल्याला अनेक गोष्टींचे वेध लागतात. वैशाखवणव्याची तलखी असह्य झालेली असते, त्यामुळे एकीकडे अधूनमधून आकाशात जमणार्‍या ढगांचे वेध लागतात, तर दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी संपवायच्या कामांची घाईगडबड चाललेली असते. घरातली अंथरुणं-पांघरुणं कडकडीत ऊन लावून काढून ठेवणे, कपाटातल्या रेशमी साड्यांना ऊन्हं दाखवून आत ठेवणे, अनेक प्रकारची वाळवणे- पापड, मिरच्या, सांडगे, पापड्या… सगळं नीट सुकवलेल्या डब्यांमध्ये भरून ठेवणे… एक ना दोन… कुळागरात सुपार्‍या, काजू, सोलं यांच्या उस्तवार्‍यांची धामधूम… तर शेतात नांगरणीच्या कामांची गडबड… रापणकारांची होड्या किनार्‍यावर आणून ठेवणे, जाळ्यांच्या डागडुजीची तयारी यासाठी खटपट, तर कौलारू घरं असणार्‍यांची घर शाकारण्याची म्हणजे कौलं परतण्याची कामं… मोठ्या आस्थापनांमध्ये मान्सूनपूर्व करण्याच्या दुरुस्त्या आणि व्यवस्थांची गडबड… असं सगळं एकंदरीत धामधुमीचं वातावरण असतं… अशातच गोमंतकीयांना वेध लागतात ते एका मोठ्या उत्सवाचे. खास या काळात साजर्‍या होणार्‍या पुरुमेंताच्या फेस्ताचे! आकाशात तुरळक ढग जमू लागलेले असतात आगामी वर्षाऋतूची नांदी होऊन, आणि इकडे पुरुमेंताचे फेस्त गाजू लागते.

हा येथील पावसाळ्याअगोदरचा सर्वात मोठा उत्सव. हा उत्सव मडगाव येथील होली स्पिरिट चर्चमध्ये सहसा जूनच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. तिथेच हे सर्वात मोठे सुपसिद्ध असे ‘पुरुमेंताचे फेस्त’ भरते. फेस्त- फिस्ट- फेरी म्हणजे एकप्रकारची जत्रा, बाजार. यानिमित्ताने उत्साहाने भरणारा बेगमीचा बाजार. पुरुमेंत हा कोकणी शब्द पोर्तुगीज ‘प्रोव्हिसांव’ या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ तरतूद, तयारी असा होतो. हा बेगमीचा बाजार साताठ दिवस भरत असतो आणि तिथे प्रचंड उलाढाल होत असते.

हे पुरुमेंताचे फेस्त शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे. पूर्वी एकूणच वाहतुकीची साधने मर्यादित होती. संध्याकाळी उशिरापर्यंत रहदारी वा वाहने अत्यल्प. आणि पावसाळ्यात तर सर्व जनजीवन बर्‍याचशा प्रमाणात बंदिस्त. असे हे सारे वातावरण… त्यात गोव्याचा महामूर पावसाळा… धो-धो अखंड कोसळणारा पाऊस. पर्यायाने मुळातच कमी असलेली वाहनेही दुष्प्राप्य. नद्या-ओढ्यांचं सतत वाढणारं पाणी, पूर या सर्वामुळे अनेक गावांचा शहरांशी संपर्कच तुटून जाई. दुर्गम भागातील जनजीवन तर फार मुश्किलीचे होई. अशा वेळी दैनंदिन गरजा भागवणे फार कष्टाचे होत असे.
माणूस कोणत्याही ऋतूत निवांतपणे जगता यावे म्हणून अनेक प्रकारे नियोजन करत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे भविष्यातील गरजेसाठी केलेली साठवण. आयुष्यातल्या महत्त्वाच्या बाबींची तरतूद जशी तो करत असतो त्याचप्रमाणे दैनंदिन गरजेच्या वस्तू, पदार्थ यांची योग्य ती तरतूद वेळोवेळी करतोच. यातली महत्त्वाची सोय म्हणजे पावसाळ्यात लागणार्‍या आणि सहजपणे उपलब्ध न होऊ शकणार्‍या गोष्टींची बेगमी. त्यासाठीच भरणारा हा बेगमीचा बाजार.

अस्सल गोमंतकीय हा मना-काळजातून मत्स्यप्रेमी. पावसाळ्यात मासेमारी बंद… तुफानी समुद्र, खराब हवामान आणि माशांचा प्रजनन काळ या सर्वच कारणांमुळे. त्यामुळे या फेस्तामध्ये प्रामुख्याने अनेकानेक प्रकारचे खारवलेले, सुकवलेले मासे उपलब्ध असणे स्वाभाविकच. आणि त्यांची उदंड खरेदी करून दीर्घकाळपर्यंतची बेगमी करून ठेवणं गोमंतकीयांसाठी अत्यावश्यकच. त्यामुळे हे या बाजाराचे एक प्रमुख आकर्षण.
याशिवाय अनेकानेक गोष्टी या फेस्तामध्ये मिळत असतात. गोव्यामध्ये निरनिराळ्या वेळी वेगवेगळ्या गावांमध्ये भरणार्‍या जत्रांचं वैशिष्ट्य म्हणजे विविध वस्तूंची भांडारं असलेली दुकानं आणि तिथे आठवडाभर होणारी खरेदी-विक्री. मंदिरांचे उत्सव, चॅपेल-चर्चचे उत्सव अशा निमित्तांनी या फेर्‍या भरत असतात आणि त्या गावकर्‍यांच्या आकर्षणाचं केंद्र असतात.

पुरुमेंताचे फेस्त हे श्रद्धा व सुविधा दोन्ही दृष्टींनी मोठे फेस्त. येथे अनेक प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूही उपलब्ध असतात. बागेसाठी विविध प्रकारच्या व विविध आकारांच्या कुंड्या, शोभेच्या वस्तू, भात करण्यासाठी विशिष्ट तपेली, बुडकुली, मोठमोठी तांब्या-पितळेची भांडी, हंडे, ऍल्युमिनियमची मोठी पातेली, मातीची गाडगी-मडकी… आता स्टीलची, काचेची सर्व प्रकारची भांडी, बरण्या मिळतात. याशिवाय पारंपरिक पद्धतीची लाकडी पाट असलेली मोठी लोखंडी पात्याची विळी (आदोळी), मुलांसाठी मातीचे ‘मिलेर’ (आजचे पिगी बँक), विविध प्रकारचे फर्निचर, पडदे, कपडे, पादत्राणे कितीतरी… याशिवाय जत्रेचं वैशिष्ट्य असणारी असंख्य प्रकारची खेळणी, फुगे आणि खास अशा ठिकाणी मिळणारा खाऊ- रेवडी, कडक लाडू, चणे, शेंगदाणे, खाजे हेही असते.

मात्र सर्वात प्रमुख खरेदी असते ती मासे, कडधान्ये, मसाले, लोणची अशा पदार्थांची. गोव्याची परंपरा, राहणीमान यांची झलक अशा ठिकाणी निश्‍चितपणे मिळते. खरे तर आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि विकसित अशा या काळात या बेगमीच्या बाजाराचे औचित्य फारसे राहिलेले नाही. आता बाजारात कोणत्याही ऋतूमध्ये नित्योपयोगी वस्तू उपलब्ध असतात. अगदी घरबसल्यासुद्धा मागवता येतात. काळाच्या ओघात कितीतरी गोष्टी बदलत असतात, तरीही काही प्रथा, परंपरा सुरू राहतात. त्यातलीच ही एक. या परंपरेशी सुविधा जोडली गेलेली होती तितकीच श्रद्धाही. त्यामुळेही जनमानसातील तिचे स्थान टिकून राहिलेले आहे.
होली स्पिरिट मडगाव हे गोव्यातील ४५० वर्षांपेक्षा जास्त जुने चर्च आहे आणि ख्रिस्ती बांधवांसाठी ही अतीव श्रद्धेची जागा आहे. समाजात श्रद्धा टिकून राहिली पाहिजे ही भावना रूढ आणि दृढ आहे. या दिवशी चर्चमध्ये सकाळी साडेनऊपासून प्रार्थनासभा (मिस्स/सेरमांव) सुरू होतात. त्या संध्याकाळपर्यंत चालू असतात. सहा मिस्स/सेरमांव प्रस्तूत होतात. या समाजास एकत्र येण्यासाठी अनेकानेक वर्षांपासून हे स्थान महत्त्वाचे ठरले आहे.

चर्चच्या आवारात एक मोठा व वैशिष्ट्यपूर्ण असा वृक्ष आहे. हे भुत्याचे झाड. त्यालाही खूप महत्त्व आहे. ख्रिस्ती फेथची सुरुवात झाल्याची हे झाड खूण आहे असे मानले जाते. चर्च बांधले गेले तेव्हा हे झाड लावले होते. त्या झाडामुळे वीज पडण्यापासून चर्चला संरक्षण मिळते, तसेच खुरीसाला सावलीही मिळते. त्यामुळे तिथे सर्वजण कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होतात.

या दिवशी सर्व पारंपरिक विधीसाठी शिष्टाचारानुसार पाद्री जो पारंपरिक वेष परिधान करतात ते लांब झगे, चर्चचे बँड व संगीत, यानिमित्त केली जाणारी रोषणाई, आतषबाजी, फटाके हेही या उत्सवाचे आकर्षण असते व त्याने उत्सवाला विशेष शोभाही येते. याशिवाय सभासदांच्या बैठका होत असतात व गरिबांसाठी निधी एकत्र करून गरजूंना मदत करण्याचे कार्यही केले जाते.

या सर्व उत्सवात नवनवीन गोष्टींचा समावेश जरी होत राहिला तरी मूळ गाभा हरवलेला नाही. याचे कारण त्याच्याशी जोडली गेलेली श्रद्धा आणि भावना; आणि याच कारणामुळे त्याची लोकप्रियताही अबाधित आहे.

पुरुमेंताचे फेस्त मुख्यतः मोठ्या प्रमाणात मडगाव येथे भरत असले तरी इतर गावांमध्येही हा बाजार या काळात भरविला जातो. वेगवेगळ्या चर्चेस्‌मध्ये हे फेस्त साजरे केले जाते आणि त्यानिमित्त फेरीही भरते. काही ठिकाणी यानिमित्ताने तियात्र फेस्टिव्हल केले जाते. या लोकप्रिय कलाप्रकाराला प्रचंड प्रतिसाद मिळतो.
काळाच्या ओघात बदलत्या प्रवाहात बेगमीच्या बाजाराची आवश्यकता काही प्रमाणात उणावली असली तरी जिथे श्रद्धा आणि सुविधा दोन्ही जोडल्या गेलेल्या असतात, ज्याच्याशी भावनिक आणि सामाजिक नातं जोडलं गेलेलं असतं, तिथे आर्थिक उलाढालीबरोबरच आठवणींची रम्य मुशाफिरी घडत असते. अशा प्रथा-परंपरांचं महत्त्व, अपूर्वाई आणि अप्रूप इतकं असतं की त्या स्वेच्छेनं, आनंदानं पाळल्या जातात. अशीच जनमानसात लोकप्रिय असलेली परंपरा म्हणजे पुरुमेंताचे फेस्त. असे उत्सव हे त्या-त्या प्रदेशाच्या संस्कृतीचा भाग असतात.

निसर्गाच्या बदलत्या रूपाबरोबरच सध्या या फेस्ताचं वातावरण तयार होऊ लागलेलं आहे. गावोगावी या फेस्ताची गडबड सुरू झालेली आहे. आणि त्या ठिकाणी भेट देऊन श्रद्धा अर्पण करण्याबरोबरच बेगमीचे कोणकोणते पदार्थ आणि नियोजनानुसार इतर कोणकोणत्या वस्तूंची खरेदी करायची याबद्दलचे मनसुबेही रचले जाऊ लागले आहेत. वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या गावांमधील पुरुमेंताच्या फेस्तांच्या तयारीच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. दोन वर्षे महामारीमुळे हे फेस्त होऊ शकले नव्हते, त्यामुळे या वर्षी तर या फेस्ताचे विशेष आकर्षण, महत्त्व आणि नागरिकांमध्ये विशेष उत्साह आहे. प्रतीक्षेचा काळ संपत आला आहे आणि जोरदार तयारी सुरू झालेली आहे!