पुराचे निमित्त करून खुल्या बाजारात महागाईचा भडका

0
128

>> भाजीपाल्याचे दर कडाडले

>> कडधान्याच्या दरामध्येही भरमसाठ वाढ

राज्यात ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर खुल्या बाजारात कडधान्य, साखर, भाजीपाल्याचे दर वाढल्याने महागाईचा भडका उडाला आहे. कोल्हापूर, सांगली या भागातील पुरामुळे भाजी, साखर आणि कडधान्यांच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. खुल्या बाजारात कडधान्ये व इतर सामानाचे दर वाढलेले असले तरी गोवा मार्केटिंग फेडरेशनच्या येथील सहकार भंडारातील वस्तूंच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनचे कार्यकारी व्यवस्थापक काशिनाथ नाईक यांनी या प्रतिनिधीशी बोलताना काल दिली.

महाराष्ट्र, कर्नाटक या भागातील पुरामुळे राज्यातील बाजारपेठेतील साखर, कडधान्ये व इतर वस्तूच्ंया दरात साधारण पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. वाहतूक खर्च वाढल्याने महागाईचा भडका उडाला आहे. पुरामुळे मालवाहू ट्रकांच्या भाड्यामध्ये मोठी वाढ झाली आहे, असा दावा येथील किराणा माल व्यावसियांकडून केला जात आहे.

राज्यात भाजी, कडधान्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर येथून आणली जाते. मार्केटमधील कांदे, बटाटे, अन्य भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कांदा उत्पादनाला फटका बसल्याने काद्यांचा दर वाढल्याचा दावा केला जात आहे. वाहतूक खर्चात कपात झाल्यास आगामी गणेश चतुर्थीपूर्वी महागाईचे प्रमाण कमी होऊ शकतात, असा दावा व्यावसायिकांनी केला आहे.

येथील बाजारपेठेतील खुल्या मार्केटमध्ये डाळ, मूग, चणाडाळ, चवळी, ग्रीन पीस, वाटाणा या कडधान्यांबरोबरच बेसन, मैदा, रवा, पामतेल, गूळ, साखरेच्या दरात वाढ झाली आहे.

मार्केटिंग फेडरेशनकडून कोल्हापूर, सांगली या भागातून कडधान्य व इतर सामान आणले जात आहे. मात्र, फेडरेशनच्या सहकार भांडारातील दरात कोणतीही वाढ झालेली नाही. खुल्या बाजारापेक्षा कमी दरात सहकार भांडारांतून विविध प्रकारच्या सामानाची विक्री केली जात आहे. साखरेचा दर सुध्दा कमी आहे. फक्त कांद्याचे उत्पादन घटल्याने दर वाढला आहे. फेडरेशनच्या सहकार भंडारासाठी लागणार्‍या सामानाची दर पंधरा दिवसांनी खरेदी केली जाते. फेडरेशनच्या सहकार भांडारामुळे खुल्या मार्केटमधील वस्तूंच्या दरावर थोड्या प्रमाणात नियंत्रण राहते.