वेळ नवी, स्थळ नवे, पण कहाणी तीच. तामीळनाडूमधील करूर येथे अभिनेता आणि नेता विजय याच्या जाहीर सभेमध्ये चेंगराचेंगरीमध्ये 39 लोक शनिवारी रात्री मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण मोठे आहे. आपल्या लाडक्या नेत्या – अभिनेत्याची कडकडीत उन्हात सकाळपासून तासन्तास केलेली प्रतीक्षा आणि भोवतालची प्रचंड गर्दी ह्या ताणाने सभेला आलेली, तहानलेली, भुकेलेली कित्येक माणसे भोवळ येऊन पडली, गर्दीत चिरडली गेली आणि बघता बघता मृत्यूच्या जबड्यात फेकली गेली. अशा प्रकारच्या जाहीर कार्यक्रमांच्या आयोजनातील बेजबाबदारपणा हा आपल्या देशात नित्याचा प्रकार होऊन बसला आहे, मग ती गोव्यातील शिरगावची लईराईची जत्रा असो किंवा तामीळनाडूतील ही सभा. धार्मिक उत्सव, नेत्यांच्या जाहीर सभा, गर्दीचे सांस्कृतिक कार्यक्रम अशा ठिकाणी अनावर झालेली गर्दी, अपुरा बंदोबस्त आणि कोलमडलेल्या व्यवस्था यातून अशा भीषण दुर्घटना घडत असतात. सातत्याने अशा दुर्घटना वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या कारणांनी घडत असूनही अशा गर्दीच्या कार्यक्रमांना प्रशासनाकडून परवानगी दिली जाते आणि दुर्घटना घडल्यावर एकमेकांकडे बोटे दाखवत जबाबदारी झटकली जाते. राज्य सरकार मग मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना काही लाख रुपये भरपाई देऊन त्यांचा आक्रोश दडपण्यात यशस्वी होते. फार तर एखादी न्यायालयीन चौकशी घोषित करून किंवा आयोजकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याचे सोपस्कार करून वेळ मारून नेली जाते. हे प्रकार आपल्याकडे नित्याचे होऊन बसले आहेत. गोव्यात गेल्या मे महिन्यात शिरगावच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन माणसे हकनाक बळी गेली. कोण त्या दुर्घटनेत दोषी ठरले? कोणाला शिक्षा झाली? पुन्हा येरे माझ्या मागल्या म्हणत पुढच्या दुर्घटनेची वाट पाहिली जात असते. तामीळनाडूत अभिनेता व नेता विजय याच्या तामिळागा वेत्री कझगम किंवा टीव्हीके ह्या नव्या राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये परवाची दुर्घटना घडली. तामीळनाडूमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळे नेते आणि अभिनेते सत्तेकडे डोळे लावून बसले आहेत. त्यापैकीच विजय हा एक. आपल्या चाहत्यांच्या आपल्यावरील प्रेमाचे रूपांतर मतांमध्ये करून घेण्याची ही धडपड दाक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. राजकारणामध्ये येऊन आपल्या लोकप्रियतेचा फायदा तिथे उठवण्याचा हा खटाटोप दक्षिणेत नेहमीच दिसतो. नेता बनलेला अभिनेता विजय याची ही सभा देखील अशाच खटाटोपाचा भाग होती. करूर येथे भररस्त्यात ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी प्रशासनाने परवानगी दिली होती संध्याकाळी तीन ते दहाची. परंतु आयोजकांनी विजय हा दुपारी बारा वाजता येईल असे जाहीर करून टाकले होते. जास्तीत जास्त गर्दी जमावी हाच त्यामागील हेतू होता हे स्पष्ट आहे. त्यामुळे विजय दुपारी येणार हे कळल्यावर सकाळपासूनच त्याचे चाहते गोळा झाले होते. तेथे त्यांच्यासाठी ना बसण्याची सोय होती, ना अन्नपाण्याची. त्यात हे महाशय उशिरा पोहोचले. उशीर म्हणजे तरी किती? दुपारी बारा वाजता येणार असल्याची घोषणा झालेले हे महोदय रात्री साडेसातच्या सुमारास तेथे पोहोचले. एका मोठ्या बसवर सुरक्षित ठिकाणी बसून त्यांनी भाषण दिले. आपल्यासाठी सकाळपासून खोळंबलेले लोक तहानलेले, भुकेलेले आहेत, सकाळपासून गर्दीत आणि चेंगराचेंगरीत उभे आहेत ह्याच्याशी त्याला सोयरसुतक नसावे. तो भाषण करू लागला तेव्हा लोक पाणी मागू लागले. त्यामुळे भाषण थांबवून काही पाण्याच्या बाटल्या त्याने प्रेक्षकांकडे फेकल्या. परंतु त्यामुळे अधिकच गोंधळ उडाला. ह्या सगळ्या रेटारेटीत बघता बघता हकनाक बळी गेले. ह्या सगळ्या चेंगराचेंगरीची दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत. मुळात एका सार्वजनिक रस्त्यावर एवढ्या मोठ्या गर्दीच्या सभेला परवानगी कशी दिली गेली असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, तर दोन दिवसांपूर्वी एका मोठ्या पक्षाची तिथेच सभा झाली होती असे उत्तर तिथल्या पोलीस प्रमुखांनी दिले. पोलिसांची संख्या अपुरी का होती असे विचारणाऱ्यांना जास्त पोलीस ठेवले असते तर चाहत्यांना जागा कमी पडली असती, असा त्यांचा युक्तिवाद होता. ही सरळसरळ आयोजकांची आणि प्रशासनाची बेफिकिरी आहे. चेंगराचेंगरीत माणसे मृत्युमुखी पडल्याचे कळल्यावरही विजय याने भाषण पूर्ण केले आणि स्वतः सुरक्षेत त्रिची विमानतळाकडे व तेथून खास विमानाने चेन्नईला निघून गेला. तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालीन यांनी आता नुकसानभरपाई आणि न्यायालयीन चौकशी घोषित केली आहे. विजय याच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवले गेले आहेत. पण अशी तोंडदेखली कारवाई मुळीच पुरेशी नाही. ह्या सगळ्याला जबाबदार असलेला अभिनेता विजय याच्याविरुद्धच खरे तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कारवाई झाली पाहिजे. तरच अशा प्रकारच्या बेजबाबदारपणाला आळा बसू शकेल. ही दुर्घटना मनुष्यनिर्मित कारणांनी झाली आहे आणि तिला जबाबदार असलेल्यांना शिक्षा मिळायलाच हवी.