देशातील कोरोना फैलावाचे प्रमाण कमी होत चालले असताना केरळमध्ये तो पुन्हा उसळी घेताना दिसत आहे. त्याच बरोबर गोव्यामध्ये देखील रुग्णांचे प्रमाण हळूहळू वाढताना दिसू लागले असून सध्या राज्यातील टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट २.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे राज्यामध्ये इस्पितळात दाखल कराव्या लागणार्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ह्याचाच अर्थ, राज्यामध्ये जे नवे कोरोनाबाधित होत आहेत, त्यांना बहुधा कोरोनाच्या डेल्टा किंवा डेल्टा प्लस व्हेरियंटची बाधा होत असण्याची अधिक शक्यता आहे, अन्यथा इस्पितळात दाखल करावे लागण्याचे प्रमाण एवढे वाढले नसते. आणखी एक गंभीर बाब म्हणजे इस्पितळात नव्याने भरती होणार्या रुग्णांच्या तुलनेमध्ये इस्पितळातून बरे होऊन घरी जाणार्यांच्या प्रमाणातही कमालीची घट दिसत आहे. म्हणजेच रुग्णांना उपचारार्थ अधिक दिवस इस्पितळात राहावे लागत असल्याचे यावरून दिसते. यापैकी अनेक रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले आहे. कोरोनाचे गांभीर्य विसरल्यामुळे व घरच्या घरीच हयगय केल्यामुळे ह्या रुग्णांचा आजार बळावला की मुळातच त्यांना बाधा झालेल्या व्हेरियंटमुळे ही अत्यवस्थ स्थिती ओढवते ह्याबाबत सरकारने स्पष्टता देणे जरूरी आहे.
गोव्यात सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गोव्याचा सर्वांत मोठा उत्सव असलेला गणेशोत्सव आठवड्याभरावर आलेला आहे. बाजार खरेदीसाठी ओसंडून वाहू लागले आहेत. घरोघरी गणेशाच्या भेटीगाठी सुरू होणार असल्याने गेल्या वर्षीप्रमाणेच चतुर्थीनंतर पुन्हा कोरोना रुग्णवाढ होणार नाही ना ही चिंता आहे. त्यामुळे सरकारने – विशेषतः पोलीस यंत्रणेने एवढ्यातच कोरोना नियंत्रणासाठी कडक उपाययोजना करायला सुरूवात करण्याची जरूरी आहे.
केंद्र सरकारने सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन कोरोनाविषयक निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत वाढवत असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. केंद्राने राज्यांना कोरोनासंदर्भात पंचसूत्री घालून दिलेली आहे. अधिकाधिक रुग्णचाचणी करणे, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, त्यांना वेळीच उपचार देणे, लसीकरणाचा वेग वाढवणे आणि सर्वत्र कोरोनाची नियमावली पाळली जात आहे हे पाहणे असे हे पाच उपाय केंद्र सरकारने सुचवले आहेत. परंतु दुर्दैवाने गोव्यामध्ये ह्याबाबतचे गांभीर्य दिसत नाही. कोरोना चाचण्यांचे प्रमाण अजूनही वरखाली होत आहे. त्यामुळे नवी रुग्णसंख्याही त्या तुलनेत कधी खाली तर कधी वर होताना दिसते. त्यामुळे राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे हे सांगणे अवघड बनले आहे. परवा चाचणीत नवे रुग्ण शंभरपार आढळले होते. गेल्या आठवड्यात दोन टक्क्यांखाली असलेला पॉझिटिव्हिटी दर आता तब्बल २.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील प्रत्यक्ष रुग्णांची संख्या पुन्हा ९५२ वर म्हणजे हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. ही आकडेवारी सतर्क करणारी आहे आणि सरकारने तिचे गांभीर्य जाणले पाहिजे.
सध्या केरळमध्ये कोरोना रुग्णांत प्रचंड वाढ होताना दिसते. तेथे रात्रीची संचारबंदीही लागू करावी लागली आहे. कोकण रेल्वेमुळे केरळ – गोवा यांच्यात दैनंदिन थेट संपर्क येतो. केरळहून येणार्या प्रवाशांचा संसर्ग गोव्यात उतरणार्यांना होत नाही ना हे पाहणारी कोणती व्यवस्था सरकारने केलेली आहे? केंद्र सरकारने अलीकडेच तिसर्या लाटेची दाट शक्यता वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर गोव्यातील तिसर्या लाटेसंदर्भातील सज्जतेबाबत सरकारने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, परंतु सरकार त्याबाबत अद्याप बेफिकिर दिसते. दुसर्या लाटेत हात पोळले गेल्यानंतर सरकारने तज्ज्ञ समित्या वगैरे स्थापन केल्या होत्या. त्यांच्या बैठका नियमितपणे होत आहेत का, त्यामध्ये कोणते निर्णय झाले आहेत, कोणत्या गोष्टींची अंमबजावणी झाली आहे आणि कोणत्या गोष्टी प्रलंबित आहेत, तिसर्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सरकारची कितपत सज्जता आहे, विशेषतः तिचा धोका असलेल्या बालरुग्णांवरील उपचारासाठी कोणत्या अतिरिक्त सुविधा उभ्या केल्या गेल्या आहेत, त्याचा तपशील सरकार कधी देणार?
एकीकडे तिसरी लाट तोंडावर असताना आणि राज्यातील रुग्णसंख्याही पुन्हा वाढू लागलेली असताना सरकार महाविद्यालये आणि नंतर शाळाही ऑफलाइन पद्धतीने सुरू करू पाहात आहे. हे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. डेल्टा व्हेरियंटच्या शक्यतेमुळे तर संभाव्य संसर्गाची शक्यता अनेक पटींनी वाढते. स्वयंघोषित शिक्षणतज्ज्ञांच्या मागे जाऊन सरकारने भलते निर्णय घेऊ नयेत. विद्यार्थ्यांचे जीवन हे त्यांच्या शिक्षणापेक्षाही अधिक मोलाचे आहे हे विसरले जाऊ नये. सरकारने विचारपूर्वक निर्णय घ्यावा. पुन्हा हात पोळून घेऊ नयेत.