नारायण राणेंचा अजित पवारना इशारा
महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील संबंधात बिघाड तीव्र होत चालला आहे. काल कॉंग्रेसचे आमदार व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील जाहीर सभेत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री आर. आर. पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले.
गरज पडली तर पुण्यात जाऊन वस्त्रहरण करू, असा इशारा राणे यांनी यावेळी अजित पवार यांना उद्देशून दिला. राष्ट्रवादी कोकणात येऊन कॉंग्रेसला सुरूंग लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. दहशतवाद कोकणात चालू असल्याचे सांगितले जाते मात्र गुन्हेगारी सिंधुदुर्गापेक्षा पुण्यातच जास्त आहे, असे ते म्हणाले. वेंगुर्ल्यात राष्ट्रवादीने दंगल घडवून विनाकारण आपल्या कार्यकर्त्यांना त्यात गोवले असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी वाट्टेल तसे वागू नये, आपणही त्याच सरकारमधील एक मंत्री आहे, हे विसरू नये, असे नारायण राणे म्हणाले.