पीएमसी खातेदारांना ६ महिन्यांत ४० हजार रुपये काढण्याची मुभा

0
74

आर्थिक निर्बंध लादलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांना रिझर्व्ह बँकेने बँक खात्यातून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे. त्यानुसार खातेदारांना आता सहा महिन्यांच्या कालावधीत ४० हजार रुपये काढता येणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने खातेदारांना पीएमसी बँकेच्या खात्यातून सहा महिन्यांत केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी सुरुवातीला दिली होती. ती मर्यादा त्यानंतर १० हजार रुपयांपर्यंत वाढवली. तरीही बँकेचे खातेधारक नाराज होते. दोन आठवड्यांपूर्वी आरबीआयने पुन्हा पैसे काढण्याची मर्यादा वाढवली. त्यानुसार खातेधारकांना सहा महिन्यांत २५ हजार रुपये खात्यातून काढता येणार होते. मात्र, काल पुन्हा आरबीआयनं खातेदारांना दिलासा देत सहा महिन्यांच्या काळात बँक खात्यातून ४० हजार रुपये काढता येणार आहेत. यासंबंधी आरबीआयनं ट्विटद्वारे माहिती दिली आहे. ज्यांनी यापूर्वी बँक खात्यातून १० हजार रुपये काढले असतील त्यांना आता आणखी ३० हजार रुपये काढता येणार आहेत.

दरम्यान, पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांची पोलीस कोठडी आझाद मैदान येथील एस्प्लानेड महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आणखी दोन दिवसांसाठी म्हणजे १६ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.