पावसाळ्यात होणारे त्वचेचे आजार

0
498
  •  डॉ. अनुपमा कुडचडकर
    त्वचारोग तज्ज्ञ
    (हेल्थवे हॉस्पिटल, ओल्ड गोवा)

केसपुळ्या येणे, ऍब्सेस होणे, सेल्युलायटीस, पायावर अल्सर (घाव) होणे ही जरा जास्त प्रमाणात पावसाळ्यात त्वचेवर होणारी बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत. मधुमेह झालेल्या आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात होऊ शकतं.

उन्हाळा संपत असताना गरमी एवढी वाढलेली असते की सगळीजणं पावसाळ्याची वाट बघायला लागतात. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे घाम जरा जास्तच येत असतो. घामोळं, ऍलर्जी, फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, इत्यादी प्रकारचे संसर्ग काही जणांना व्हायला लागतात. जरी पावसाळा सुरू झाला तरी सुरुवातीला थोडीफार गरमी होतच असते. घामपण भरपूर येतो. त्यामुळे गरमीमुळे होणारे त्वचेचे संसर्ग वाढू शकतात. काहींना नव्याने होत असतात.

पावसाळ्यातसुद्धा काहींना घामोळं होतं. पावसात भिजल्यामुळे ज्यांना आधीच फंगल इन्फेक्शन झालेलं असतं, ते वाढायला लागतं. फंगल इन्फेक्शनला गजकर्ण किंवा दाद म्हणतात. त्वचेवर वर्तुळाकार चट्टे येणं हे गजकर्णचं सुरुवातीचं लक्षण असतं. हळुहळू ते वाढायला लागतात. आजुबाजूला नवीन चट्टे उठायला लागतात. या चट्‌ट्यांना भयंकर खाज येते. खाजवून खाजवून काहीजण त्वचा ओरबाडूनही टाकतात. गजकर्ण लहान मुलांपासून तर प्रौढ व वयस्कर व्यक्तींनाही होऊ शकतं.

गजकर्ण एकदा घरात एखाद्या व्यक्तीला झालं की मग ते घरातल्या इतर लोकांमध्ये पसरू शकतं. कपडे, टॉवेल व इतर वस्तू ज्या सर्वजण हाताळतात, त्या संपर्कात आल्यामुळे ते इतरांमध्ये पसरतं. ज्यांच्या घरात कुत्रं किंवा मांजर असतं त्यांनी जरा अशा जनावरांची जास्त काळजी घ्यावी. कारण जर त्यांना फंगल इन्फेक्शन झाले असेल तर ते घरातल्या माणसांना होऊ शकतं.
केसतोड वा केसपुळ्या याच्या स्वरूपातील बॅक्टेरियल इन्फेक्शनही पावसाळ्यात जास्त दिसतं. मधुमेह असलेल्यांमध्ये हे जास्त आढळतं. पू भरलेल्या पुळ्या व त्वचेवर घाव होणं हे लहान मुलांमध्ये पावसाळ्यात जास्त आढळून येतं. डास वा इतर किटाणू चावून खाज येणे आणि त्यावर खाजवल्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं ही लक्षणं पावसाळ्यात जास्त आढळून येतात.

बॅक्टेरियल इन्फेक्शन – डास चावल्यामुळे, खाजवून झालेल्या घावांवर किंवा कुठेही त्वचेवर झालेल्या इजेच्या ठिकाणी मुलांना हे इन्फेक्शन होऊ शकते. जिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं तिथे पू भरलेल्या पुळ्या येतात. त्या खूप दुखतात. एकेकदा त्या फुटून त्या ठिकाणी जखमा होतात. त्यातून पाण्यासारखा द्रव निघतो. त्याला ‘पायोडर्मा’ किंवा ‘इंपेटीगो’ म्हणतात. हे इन्फेक्शन लहान मुलांमध्ये एकमेकांना लागून पसरू शकते. ज्या मुलांना त्वचेवर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असतं, अशा मुलांनी बाकीच्या मुलांमध्ये पूर्ण बरं होईपर्यंत खेळू नये. बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेल्या मुलांना लगेचच डॉक्टरांकडे घेऊन जाऊन त्यावर योग्य ते उपचार करावेत.
– सर्वप्रथम त्वचा स्वच्छ ठेवावी.
– साबण वापरून स्वच्छ आंघोळ करावी.
– आंघोळीनंतर त्वचा कोरडी पुसावी.
– अँटीबॅक्टेरियल क्रीम इन्फेक्शन झालेल्या भागावर लावावं.
– इन्फेक्शनचं प्रमाण जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक औषधं घ्यावीत.

तसेच केसपुळ्या येणे, ऍब्सेस होणे, सेल्युलायटीस, पायावर अल्सर (घाव) होणे ही जरा जास्त प्रमाणात पावसाळ्यात त्वचेवर होणारी बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत. मधुमेह झालेल्या आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात होऊ शकतं. अशा रुग्णांनी त्वचेची जास्त काळजी घ्यावी.
पावसाळ्यात पायांवर, बोटांच्या खाचांमध्ये काही इजा झालेली असेल तर त्यावर त्वरित उपचार करावेत. त्यामुळे अशा प्रकारची इन्फेक्शन्स आपण टाळू शकाल. त्वचा स्वच्छ व कोरडी ठेवावी. त्वचा जास्तच कोरडी असेल तर मॉईश्‍चरायझरचा वापर करावा. काही त्वचेची इन्फेक्शन्स झालेली आढळली तर त्याच्यावर लगेच उपचार करावेत.