पावसाचे सरासरी प्रमाण १८ टक्क्यांनी घटले

0
141

राज्यात वाळपई येथे सर्वाधिक ४१.४१ इंच आणि म्हापसा येथे सर्वांत कमी २५.८३ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ३६.९१ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे सरासरी प्रमाण १८ टक्के एवढे कमी आहे.

राज्यातील काही भागात चोवीस तासात पावसाची नोंद झाली आहे. साखळी येथे १.४० इंच, ओल्ड गोवा येथे १.३१ इंच आणि मडगाव येथे १.११ इंच पावसाची नोंद झाली. सांगे, केपे, मुरगाव, पणजी, म्हापसा येथे थोड्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात दाबोळी येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. तथापि, वाळपई भागात पावसाचे प्रमाण वाढल्याने वाळपईमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक ४१.४१ इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे आणि केपे येथेही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे ४१.०३ इंच आणि केपे येथे ४०.९६ इंच पावसाची नोंद झाली आहे.

फोंडा येथे ३९.६३ इंच, दाबोळी येथे ३९.५१ इंच, मडगाव येथे ३७.९४ इंच, काणकोण येथे ३७.२९ इंच, साखळी येथे ३५.९७ इंच, पेडणे येथे ३५.६६ इंच, ओल्ड गोवा येथे ३५.८० इंच, पणजी येथे ३४.४६ इंच, मुरगाव येथे ३१.४० इंच पावसाची नोंद झाली आहे.

धरणांमध्ये पाणी वाढले
राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यामध्ये प्रमुख धरणातील पाण्याची पातळी खूपच कमी झाली होती. राज्यातील प्रमुख साळावली धरणामध्ये पाण्याचा साठा ३६ टक्के एवढा झाला आहे. सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरणामध्ये १६ टक्के, डिचोली तालुक्यातील आमठणे धरणामध्ये ५९ टक्के, फोंडा तालुक्यातील पंचवाडी धरणामध्ये ४८ टक्के आणि काणकोण तालुक्यातील चापोली धरणामध्ये ५१ टक्के पाण्याचा साठा झाला आहे.