पार्सेकरांना बदला; अन्यथा मगो स्वबळावर

0
103

>> फोंड्यातील प्रचारसभेत मगो नेत्यांचा पुन्हा इशारा

>> मगोने फोडला प्रचाराचा नारळ

युतीतून बाहेर पडण्याचा विचार मगो पक्ष करीत नाही. परंतु मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पायऊतार न झाल्यास मगो स्वबळावर निवडणूक लढवण्यास सज्ज असून २२ उमेदवार सहज निवडून येतील असा दृढ विश्‍वास मंत्री दीपक ढवळीकर यांनी काल फोंडा येथे झालेल्या प्रचार सभेत व्यक्त केला. तत्पूर्वी, काल संध्याकाळी ४ वाजता मगो पक्षाने म्हार्दोळ येथील श्री सातेरी व श्री महालसा मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला प्रारंभ केला. यावेळी साबांखामंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री दीपक ढवळीकर, आमदार लवू मामलेदार, डिचोलीचे आमदार नरेश सावळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नारळ वाढवून प्रचाराला सुरूवात केल्यानंतर आयोजित जाहीर सभेला साबांखामंत्री सुदिन ढवळीकर, आमदार लवू मामलेदार, स्वातंत्र्यसैनिक रोहिदास नाईक, पांडुरंग कुंकळ्येकर, सरपंच राजेश कवळेकर, दामोदर नाईक, गणपत नाईक, दिलेश गावकर, जि. पं. सदस्या चित्रा फडते, शिवदास गावडे, मोहन वेरेकर व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सरकारवर कडाडून हल्ला चढवताना दीपक ढवळीकर म्हणाले की, भाजपाने युतीचा धर्म पाळण्यास शिकणे सर्वप्रथम गरजेचे आहे. विद्यमान सरकारवर जनता नाराज आहे. मगोने मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री बनून गोव्याची प्रगती व्हावी, या उद्देशाने युती केली होती. परंतु गेल्या दोन वर्षांत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मगोच्या आमदारावर अन्याय केला आहे. भाजपाला जर येत्या निवडणुकीत युती हवी असेल तर मगोच्या सर्व अटी मान्य कराव्या लागतील, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी कामे रोखली : सुदिन
मगोचा मुख्यमंत्री होण्यासाठी पक्षाचे २२ आमदार निवडून देणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले. विनाकारण नाहक घोषणा करून विद्यमान मुख्यमंत्री चक्रव्यूहात सापडले आहेत. युती सांभाळण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांवर असते. परंतु मुख्यमंत्री विकासकामांच्या फाईल्स रोखून धरीत असल्याने कामे रखडत असल्याचे टीका मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली. आमदार लवू मामलेदार यांनी मगो पक्षाच्या आमदारांना युतीच्या सरकारमधील मंत्र्यांनी सहकार्य केले नाही. फक्त कामे रोखून धरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.