केंद्रीय निवडणूक आयोगाची आजची गोवा भेट लांबणीवर

0
95

येत्या २०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाची आज दि. १२ रोजीची नियोजित गोवा भेट रद्द करण्यात आली आहे. काल संध्याकाळपर्यंत गोवा भेटीची नवी तारीख कळविण्यात आली नव्हती.

आयोगाचे पथक आज गोव्यात येऊन येथील मुख्य निवडणूक अधिकारी, राजकीय पक्षांचे नेते व अन्य संबंधित घटकांशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारीचा अहवाल मुख्य निवडणूक आयोगाला सादर करणार होते. आयोगाला अहवाल सादर केल्यानंतर कोणत्याही क्षणी आयोग गोवा विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील, अशी चर्चा चालू होती. आज निवडणूक आयोगाच्या पथकाने गोवा भेटीचा कार्यक्रम निश्‍चित केला होता. त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी सर्व संबंधितांना तशी माहिती दिली होती. परंतु काल अचानक आयोगाने गोवा भेट रद्द केली, अशी माहिती अधिकारी दुर्गाप्रसाद यांनी दिली. आयोगाने कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर केल्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.