बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ७९व्या वाढदिनाचे औचित्य साधत काल एका पान मसाला कंपनीच्या जाहिरातीतून अंग काढून घेतले. अमिताभ बच्चन यांनी या पान मसाल्याच्या कंपनीसोबत केलेला करार रद्द केला आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी जाहिरातीसाठीचे मानधन देखील परत केले आहे. हल्लीच राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संघटनेचे (नोटा) अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी बच्चन यांना पत्र लिहून त्यांनी पान मसाल्याची जाहिरात करू नये, असे आवाहन केले होते. तसेच तंबाखूविरोधी मोहिमेला पाठिंबा द्यावा, अशी मागणी डॉ. साळकर यांनी पत्राद्वारे त्यांच्याकडे केली होती. आपण तंबाखूविरोधी मोहिमेला पाठिंबा दिल्यास तरुण पिढीमधील व्यसनाधीनतेला आळा बसेल. परिणामी असंख्य युवकांचे अनमोल असे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल, असे डॉ. साळकर यांनी पत्रात नमूद केले होते. तसेच पान मसाल्याची जाहिरात करीत असल्याबद्दल गेल्या काही काळापासून नेटिझन्स देखील बच्चन यांना ट्रोल करीत होते.
या पार्श्वभूमीवर बच्चन यांनी काल आपल्या वाढदिनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित पान मसाला कंपनीच्या जाहिरातीतून माघार घेतल्याचे जाहीर केले. करार रद्द करण्याबरोबरच पान मसाला कंपनीकडून जाहिरातीसाटी घेतलेले मानधन देखील त्यांनी परत केले आहे. करार मोडत असताना ही जाहिरात ‘सरोगेट जाहिरात’ श्रेणीत येत असल्याची कल्पना त्यांना नव्हती, असे स्पष्टीकरण बच्चन यांच्या टीमकडून देण्यात आले आहे. दरम्यान, सिगारेट, तंबाखू यासारख्या जाहिराती ज्यांच्यावर बंदी आहे किंवा जी ठराविक वयोगटासाठी जाहिरात आहे, अशा जाहिरातींचा समावेश सरोगेट जाहिरात श्रेणीत होतो.