ड्रग्जच्या नशेचे विस्तारणारे वेड

0
47
  • राजेंद्र पां. केरकर

अंमलीपदार्थ नियंत्रण पथकाच्या क्रूझवरच्या रेव्ह पार्टीवर घातलेल्या छाप्यात प्रतिष्ठित मंडळी जेरबंद झाल्याने या प्रकरणाची वाच्यता झालेली आहे. अंमलीपदार्थ सेवन-तस्करीत आपल्या आयुष्याची होळी करण्यास सिद्ध झालेल्या मंडळीला विधायक कार्यात गुंतवण्याचे मोठे आव्हान आपल्या विस्कटलेल्या समाजव्यवस्थेसमोर आ वासून उभे आहे.

आजच्या तरुणाईला बर्‍याचदा नको असलेले धाडस करण्याच्या नादापायी नशापानाची जडलेली आवड हा हा म्हणता व्यसनात परिवर्तित होते. आपणासमोर ‘आ’ वासून उभी असलेली आव्हाने स्वीकारून, त्यांना भिडण्याऐवजी तरुणाई नैराश्याच्या गर्तेतून मुक्त होण्यासाठी व्यसनाच्या आहारी जाते. धूम्रपान, मद्यपान, अंमलीपदार्थ सेवन अशा नशा आणण्याच्या दृष्टीने साहाय्यभूत ठरणार्‍या व्यसनांच्या नादात तरुणाई आपल्या वर्तमान आणि भवितव्याला सुरुंग लावण्याबरोबरच कुटुंबातले सौहार्द, सौजन्य उद्ध्वस्त करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. जीवनात येणार्‍या यशाचे आपण ज्या उत्साहाने स्वागत करतो, त्याच पद्धतीने आकस्मिकपणे येणार्‍या अपयशाला सामोरे जाण्याऐवजी, तरुणाई आलेल्या नैराश्याला दूर करण्यासाठी अंमलीपदार्थांचा सहज आणि नावीन्याचा अनुभव घेण्याच्या नादापायी आहारी जाण्यात धन्यता मानते. कवी अनंत काणेकर यांनी आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे-
चल उडुनी चालली रात
कशाला उद्याची बात?
भरभरून पिऊ रसरंग नऊ
बुडुनी जाऊ प्रीतीच्या रंगात…
अशी तरुणमंडळी ड्रग्जच्या सेवनात आपले प्रारंभी अस्तित्व हरवून बसत असताना सर्वस्वाचा होम करून टाकतात. टाळी जशी एका हाताने वाजत नसते, तशीच तरुणमंडळी आज ज्या गतीने नशापानात गुरफटत चालली आहे त्याला आधुनिक काळात एक गरज म्हणून निर्माण झालेल्या कुटुंबव्यवस्थेबरोबर उद्ध्वस्त होत असलेली सामाजिकव्यवस्थाही कारणीभूत आहे. माझ्या लहानपणात मी जी सुख-चैन अनुभवलेली नाही, त्याचा अनुभव घेण्यास माझ्या मुलांची आबाळ होऊ नये अशा मानसिकतेमध्ये आज समाजात विलक्षण वाढ होत असल्याने नशापानाचे प्रस्थ झपाट्याने विस्तारत आहे. ‘हम दो, हमारे दो’ अशा चौकोनी कुटुंबविश्‍वात आजी, आजोबा, काका, काकी आदी सदस्यांनी गजबजलेली घरं इतिहासजमा होऊ लागल्याने छोट्या कुटुंबातले बरेचसे पालक आपल्या मुलांना लाडात वाढवतात. त्यांच्या इच्छा-आकांक्षांच्या पूर्ततेसाठी जमवलेली पुंजी पणाला लावण्यास सिद्ध असतात. त्यामुळे अशी मुलं आईवडिलांकडून पुरवल्या जाणार्‍या हट्टाद्वारे इतकी शेफारत जातात की त्याच नादात सिगरेट, दारू यांसारख्या नशिल्या गोष्टींच्या विळख्यात फसत असताना ड्रग्जच्या मोहमयी जगात अस्तित्वाचे भान विसरून जातात. आज ड्रग्ज महानगरे, शहरे येथून गावोगावी आपले प्रस्थ निर्माण करण्यात सफल ठरलेली आहेत. एकेकाळी उच्चभ्रू समाजातली महानगरातली तरुणाई ड्रग्जचे सेवन करण्यात गुंतलेली पाहायला मिळायची. परंतु सध्या ड्रग्जच्या उपलब्धतेचे लोण गावोगावी पोहोचलेले आहे. प्रेमभंगाची वेदना पचवू न शकलेले, शिक्षण घेऊन बेकारीपायी जगण्यातला उत्साह हरवून बसलेल्यांबरोबर ऐषआरामात राहणार्‍या अगदी सुखवस्तू कुटुंबातले तरुण ड्रग्जच्या नशेत गुरफटलेले पाहायला मिळतात. गेल्या दोन वर्षांत कोविड- १९ महामारीमुळे लागू झालेल्या नियमावलीपायी नशापानाची समस्या नियंत्रणात होती अशा भ्रमात असताना, या काळातही ड्रग्ज मिळवण्यासाठी गावोगावी, शहरोशहरी वेगवेगळ्या क्लृप्त्यांना वाव मिळाल्याचे स्पष्ट झालेेले आहे.

पूर्वी ड्रग्ज पुरवणारी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे प्रचंड पैसा कमावण्यासाठी पडद्याआड कुकर्मे करायची. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या या व्यवसायातल्या प्रारंभीच्या मंदीला गती देण्यासाठी या धंद्यातले सराईत गुन्हेगार नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपले षड्‌यंत्र सफल करण्यात यशस्वी झालेले आहेत. डार्क वेबच्या, त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या आधारे ड्रग्ज सहजपणे पोहोचवण्यात या धंद्यात गुंतलेले गुन्हेगार सफल ठरलेले आहेत. घरबसल्या ड्रग्ज उपलब्ध होऊ लागल्याने तरुण-तरुणींच्या नशापानाला आपसुकपणे त्यामुळे खतपाणी लाभत आहे.

कोविड महामारीच्या तिसर्‍या लाटेचे भय टांगते असताना मुंबई ते गोवा जलमार्गावरच्या क्रुजवर रंगलेल्या नशिल्या श्रीमंत तरुणाईच्या जल्लोषात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान अंमलीपदार्थ नियंत्रण पथकाकडून अटक होऊन कोठडीत गेल्याने पुन्हा एकदा भारतीय सिनेसृष्टीतल्या बड्या धेंडांच्या कुकर्माबाबत चर्चेला उधाण आलेले आहे. १९९७ च्या सुमारास अभिनेता शाहरूख खानच्या ड्रग्जसंदर्भात असलेल्या मानसिकतेवर कळस चढवण्याचा पराक्रम त्याच्या लाडावलेल्या पुत्राने केलेला आहे. एकेकाळी किमती विदेशी दारू आणि सिगरेट यांचे व्यसन हे बॉलिवूडच्या म्होरक्यांच्या प्रतिष्ठेचे लक्षण ठरले होते. आज धूम्रपान, मद्यपानाची जागा अंमलीपदार्थांच्या सेवन आणि विक्रीच्या व्यवसायाने घेतलेली आहे. अफू, गांजासारख्या अंमलीपदार्थांबरोबर चरस, हेरॉईन, एलएसडी, कोकेनसारख्या विलक्षण नशा आणणार्‍या जहरी पदार्थांनी तरुणाईच्या जिभेवर वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. अफू, गांजाच्या पारंपरिक सेवनाला हायड्रोपोनिक गांजाचा पर्याय उपलब्ध झाला. महागड्या अंमलीपदार्थांऐवजी झटपट कमी खर्चात नशा आणणारे प्रयोग सफल झाल्याने एमडीसारख्या रसायनयुक्त अंमलीपदार्थाच्या स्वस्त आणि मस्त पर्यायाच्या नादापायी तरुण-तरुणीचे विश्‍व हा हा म्हणता मानगुटीवर इतके बसले की त्यांच्याविना जगणे हा विचार करणे व्यसनी तरुणाईला कठीण ठरलेले आहे. त्यामुळे जेव्हा हॉटेल्स, रेस्टॉरंट खुली नव्हती तेव्हा त्यांना डार्क वेब आणि सोशल मीडियाने ड्रग्ज उपलब्ध करून जहरी विश्‍वाच्या गर्तेत ढकलण्यात मदत केलेली आहे. एखाद्या गुन्हेगारी टोळीच्या मदतीने धनदांडग्यांच्या बंगल्यांवर किंवा मालमत्तेवर उघड छापा घालण्याऐवजी अंमली पदार्थांची तस्करी करून त्यांची उपलब्धता नशाबाज युवक-युवतींना करून झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग काही मंडळीने स्वीकारलेला आहे. त्यांना प्रतिसाद देण्यासाठी गर्भश्रीमंत कुटुंबातली लाडावलेली तरुणाई एका पायावर सिद्ध असल्याने त्यांचा धंदा तेजीत विस्तारत चालला आहे. ‘कॉर्डेलिया द इंप्रेस’ या मुंबई-गोवा सागरीमार्गावरच्या जहाजावरच्या रेव्ह पार्टीत सहभागी होण्यासाठी महागडी तिकिटे खरेदी करून नशाबाज युवक-युवतींचा भलामोठा तांडा अंमलीपदार्थ नियंत्रण पथकाच्या छाप्यात सापडल्याने तो चर्चेचा विषय झालेला आहे. बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला- आर्यन खानला- अटक करून चौकशीसाठी जेरबंद केल्याने आणि त्यासंदर्भात उलटसुलट चर्चेला उधाण आल्याने ही बाब सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. आर्यन खान आणि त्याच्या मित्र-मैत्रिणींबरोबर धनिकांच्या नशाबाज मुलांचा या रेव्ह पार्टीत सहभाग होता. कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर नियमावली लागू असताना ‘कॉर्डेलिया द इंप्रेस’ या जहाजावर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत इतकी विलक्षण गर्दी होणे आणि अंमलीपदार्थ नियंत्रण पथकामार्फत त्याचा पर्दाफाश होणे ही गंभीर बाब आहे. क्रूझवरच्या या रेव्ह पार्टीत १८०० जणांना सहभागी करून घेतल्याने, त्याविषयीची व्यापकता लक्षात येते.

कुणी फॅशन डिझायनर, कुणी नृत्य प्रशिक्षक… अशा लाखो, कोटी रुपयांची सहजपणे उधळण करणार्‍या बड्या धेंडांच्या मुला-मुलींबरोबर अन्य धेंडांचा समावेश या नशिल्या, बेधुंद ताफ्यात असल्याने आज आपल्या एकूण सडत चाललेल्या मनोवृत्तीचे विदारक चित्र प्रकर्षाने समोर आलेले आहे. बॉलिवूडच्या युनियेत नाव, पैसा आणि प्रतिष्ठा संपादन केल्यावर आपले अभिनेते आणि तारका त्यांना पाहिजे ते करण्यास ते मोकळे असतात. कायदा, सुव्यवस्था यांना आव्हान देऊन भ्रष्टाचारी यंत्रणेच्या साहाय्याने आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागांत अंमलीपदार्थांची तस्करी, सेवन तेजीत सुरू असून, कधीतरी आकस्मिकपणे त्यांच्यावर पडणारा छापा काही काळ वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांतल्या बातम्यांद्वारे सनसनाटी निर्माण करतात. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काहीकाळ कोठडीत राहिल्यावर बर्‍याचदा ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सुटतात आणि पुन्हा आपल्या जिभेचे चोचले भागवण्यात मश्गुल होतात. अंमलीपदार्थ नियंत्रण पथकाच्या क्रूझवरच्या रेव्ह पार्टीवर घातलेल्या छाप्यात प्रतिष्ठित मंडळी जेरबंद झाल्याने या प्रकरणाची वाच्यता झालेली आहे. अंमलीपदार्थ सेवन-तस्करीत आपल्या आयुष्याची होळी करण्यास सिद्ध झालेल्या मंडळीला विधायक कार्यात गुंतवण्याचे मोठे आव्हान आपल्या विस्कटलेल्या समाजव्यवस्थेसमोर आ वासून उभे आहे.