पानाचा डबा

0
1299

– संदीप मणेरीकर
परवा घरी गेलो आणि त्यावेळी आमच्या आवाठातील सरस्वती हिने मला ‘जारे भितुरलो पानाचो डबो घेवन ये’ असं सांगितलं. आणि पानाचा डबा आणताना मन भुतकाळात रमलं. माझी आजीही अशीच मला बहुतेक वेळा ‘जारे, तो पानाचा डबा घेऊन ये’ असं सांगायची. आणि मी पानाचा डबा आणत होतो. त्यावेळी आत काय आहे याची काही कल्पना नसायची. बहुतेकवेळा पानं त्यात नसायची. पण तो उघडून बघण्याचा अधिकारही आजीचा होता. मग आजीने डबा उघडून पाहिल्यानंतर आत काय आहे, काय नाही त्याप्रमाणे ती आज्ञा करायची. चुना बहुतेक वेळा असायचा. पण पानं, सुपारी किंवा तंबाखू हे पदार्थ त्यात बहुतेक वेळा नसायचे. त्यामुळे ते आणायला आजी मला सांगत असे, कधी अडकित्ता कुठेतरी पडलेला असायचा. तोही शोधून आणायची जबाबदारी मला उचलावी लागत असे. मग कोणीतरी पान खाण्यासाठी म्हणून घरी येत असे, त्याला पान सगळं द्यायचं नाही. ते अर्धंच द्यायचं. त्याला ओला बेडा की सुकी सुपारी ते विचारून त्याप्रमाणे द्यायचं, तंबाखू अगदी काटकसरीनं द्यायचा. अशा कितीतरी गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागत होत्या. आजीचं ह्या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष असे. कोणाला अर्ध पान द्यायचं, कोणाला एक पान द्यायचं, कोणाला ओला बेडा, कोणाला सुपारी सारं ती कटाक्षानं पहायची. आमच्या घरी त्यावेळी खूप लोक येत असत. त्यातील बहुतेकांना हे पान-तंबाखूचं व्यसन होतं. दहा माणसांपैकी आठ जणांना तरी पान, तंबाखू, चुना लागायचा. कामासाठी खूप मोठ्या प्रमाणात घरी गडीमाणसं यायची, त्यांना विडी किंवा पानाचं व्यसन होतंच. त्यामुळे पानाचा डबा हा तयारच असायला हवा होता. काही काही लोक तर असे येत की आपल्यासोबत तंबाखू, चुन्याची डबी आणत. त्यात आमच्या घरी या डब्यात असलेला चुना, तंबाखू भरून घेऊन निघून जात असत. तंबाखू आणि चुन्याची एक डबी असायची. त्याला एका बाजूने चुना व दुसर्‍या बाजून तंबाखू भरून ठेवायची सोय होती. काहीजण पानंही भरून घेऊन जात होते. त्यामुळे त्या पानाच्या डब्यात जास्त पानं किंवा तंबाखू ठेवायला आजी देत नव्हती. आमच्या घरात पान खाणारी आजीच. दादा कधीतरी खायचे पण लहर आली तर. आईही तसं क्वचितच. पण जास्त आजीच खायची. पण तिची खाण्याची पद्धतही वेगळीच अगदी लहान लहान तुकडे ती खात असायची. सुपारीही अगदीच बारीक केलेली. कारण दातांची समस्या होती.
मला आठवतोय तो लहानपणीचा एक तांबडा डबा. त्यावर ‘फारगो मेटल्स’ असं लिहिलेलं होतं. काळ्या अक्षरांनी. आणि मी त्या डब्याची गाडी गाडी करून खेळत असे. पत्र्याचा तो डबा मग कधीतरी बदलला गेला आणि त्या जागी मग विविध प्रकारचे डबे आले. मध्येच कधीतरी एक छोटी पातेलीही आली होती. त्यानंतर पिशवी, असे विविध प्रकार आले. सध्या मात्र एक प्लास्टिकचा डबा आहे.
ह्या पान खाणार्‍यांच्या जवळही विविध प्रकारच्या पिशव्या असतात. पूर्वी काही लोकांकडे चंची असायची. मस्तपैकी गुंडाळी केलेली कप्प्याकप्प्यांची चंची. त्याच्या आत पानासाठी लागणार्‍या प्रत्येक जिन्नसासाठी एकेक कप्पा असायचा. त्यात पानं, सुपारी, तंबाखू, वेलची, लवंग, बडिशेब असे नाना पदार्थ आणि अडकित्ताही ठेवला जायचा. एका टोकाला नाडी किंवा दोरी असायची. पान खाऊन झाल्यानंतर चंची गुंडाळायची. आणि मग गुंडाळलेल्या त्या चंचीभोवती ती दोरी घट्ट बांधायची. आमच्याकडे एका व्यक्तीला तर त्याच्या नावाऐवजी (त्याच्यापाठीमागून) ‘चंची’ म्हणूनच ओळखलं जातं. तशीच एक छोटीशी नाडीची पिशवी असते. त्यात कप्पे वगैरे नसतात. पण त्यात चुना-तंबाखूचा डबा, पानं, सुपारीचे आपण खाऊ तेवढ्या आकाराचे तुकडे असतात. असे तुकडे करून घेतले की, अडकित्त्याचं ओझं वहायला नको ही त्यामागे दूरदृष्टी असावी. या पिशव्या बहुतेक बायकांकडे असतात. पान खावून झालं की नाडी ओढायची. नाडीनं त्या पिशवीचं तोंड बंद करायचं आणि कमरेला ती चंची खोवायची आणि मग पुढे कामाला सुरूवात करायची.
पान खायची पद्धत ही बहुधा जेवल्यानंतर आहे. आज पानाचे विविध प्रकार पानवाल्यांकडे मिळतात. पान खाणारे शौकीन जे आहेत त्यांना त्यातील जाती व प्रकार माहीत असतात. पण जेवल्यानंतर पान खाणं हा एक शौक झाला आणि तोंडात पान हवंच असं वाटणं हे व्यसन झालं. केव्हाही तोंडात पान हवंच असणार्‍या व्यक्तीही कितीतरी असतात. पानांमुळे दात तांबडेलाल होतात, चुन्यामुळे जीभ फुटते. ओली सुपारी असेल तर तीही काहीजणांना लागून चक्कर येण्याचे प्रकार घडतात. पण पान खाणं ही माणसं सोडत नाहीत.
बसमध्ये तर अशी ही माणसं बस जोरात सुटली की खिडकी उघडतात आणि पचकन् थुंकतात. त्यामुळे पान न खाणार्‍या मागच्या सीटवरील प्रवाशालाही ते आपलासा करून सोडतात. आपल्यात व त्याच्यात काहीच दुजाभाव रहायला नको, अशी यांची पक्की धारणा झालेली असते. बस थांबल्यानंतर थुंकावं हे त्यांना माहितच नसतं. तरीही बसमध्ये थुंकू नका, असं लिहिलेलं असतं. पण ते वाचूनही लोकं थुंकतात, तसंच धुम्रपान निषिद्ध वगैरे लिहिलेलं असतं. तिथे सिगरेटचं चित्र काढलेलं असतं. ते चित्र पाहून सिगरेट वा विडी ओढणार्‍यांना तल्लफ येते व लगेच ते बसमध्ये इतरांना त्रास होत असेल वगैरे सद्सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून धुम्रपान करू लागतात.
बरं हे पानवाले पान खाऊन बाहेर थुंकतात तर धुम्रपान करणारे थोटकं बसमध्ये टाकतात. या पानवाल्यांकडे बसमध्येही पान खाण्याची सोय असते. त्यांना नियम लागू असत नाहीत. ते बिनधास्तपणे पान खात असतात. शेजारी कोणी पानाचा शौकीन असेल तर त्यालाही ते पान देतात. बरेच कंडक्टर पान खाणारे असल्यामुळे तेही अशा लोकांना काही बोलू शकत नाहीत. उलट कंडक्टरलाच ते पान देऊन त्याचा आवाज बंद करत असतात.
पण एक गोष्ट अशी विचित्र आहे की, नुकतंच पान खाल्लय आणि लगेच चहा प्यायला मिळाला तर ही मंडळी चहा पिऊन झाल्यावर त्वरित पानाच्या पिशवीत हात घालून पान तयार करू लागतात. म्हणजे चहाची चव जिभेवर रेंगाळायलाही ही मंडळी देत नाहीत. जेवण झाल्याबरोबर हाताला असलेला भोजनाचा सुवास लुप्त होण्यापूर्वीच तोंडात पानाचा तोबरा भरला जातो. त्यानंतर त्यांना बोलतानाही भयंकर त्रास होत असतो. त्याहीपेक्षा ते बोलणं ऐकणार्‍याला त्याचा जास्त त्रास होत असतो. ठ, फ, अशी अक्षरं असलेले शब्द उच्चारताना तर पान खाणार्‍यापेक्षा ऐकणार्‍याला जास्त जपावं लागतं. कधी समोरून तांबडी पिचकारी येऊन तुमचा चेहरा तांबडालाल करील सांगता येत नाही.
आमच्या घरी कामासाठी येणार्‍या बहुतांश लोकांना अशी पानं खायची सवय आहे. पण त्यांची पान खायची पद्धत राखून राखून खाण्याची आहे. अर्धं पान, त्याच्याही अर्धं पान अशा तर्‍हेने ते पानं खातात. तिखट तिखट पानाच्या रसासोबत चुना-तंबाखू आणि सुपारी खाण्यात त्यांना फार मजा येत असावी. काही लोकं पानाला चुना लावतात त्यावर सुपारी टाकतात व खातात आणि पाठीमागून मग तंबाखूची चिमूट तोंडात टाकतात. पान खाण्याची प्रत्येकाची पद्धत निरनिराळी आहे.
आज आमच्या घरी आजी नाही. त्यामुळे पान खाण्याचा प्रकार थांबलेला आहे. कामासाठी येणार्‍या माणसांचा ओघही खूपच कमी झालेला आहे. शेती-बागायतीच्या कामासाठी येणारी माणसं आता मुलाने पाठवलेल्या मनीऑर्डरवर जगत आहेत. त्यातच सरकारने त्यांच्यासाठी विविध योजना राबवल्याने त्यांना काम न करताही भरपूर उत्पन्नाची साधनं प्राप्त झालेली आहेत. त्यामुळे काम करण्याची वृत्ती नष्ट झालेली आहे. तर नव्या पिढीचा ओढा केवळ सरकारी किंवा खाजगी नोकरीकडे असल्यामुळे त्यांनी शेती या विषयावरच पाणी सोडलेलं आहे. त्यामुळे शेतजमिनी पडीक झालेल्या आहेत तर बागायतीत काहीच राम नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. मजूर कमी झाल्यामुळे मजुरांचा भाव वाढलेला आहे, त्यांची मजुरी वाढलेली आहे आणि ती देणं बागायदारांना अशक्यप्राय झालेली आहे. त्यामुळे साहजिकच आमच्या घरी जो पूर्वी माणसांचा राबता होता तो अत्यंत कमी झालेला आहे. त्यामुळे एकेकाळी दिमाखात असलेला पानाचा डबा आज मात्र कुठेतरी अडगळीच्या जागी असतो. त्यात आवश्यक असलेल्या चुना, तंबाखू, सुपारी ह्या चीजवस्तूही असल्या तर असतात, अशी त्याची अवस्था झालेली आहे. या एकेकाळच्या सम्राटाला आज अंधारकोठडीचं आयुष्य जगावं लागत आहे.