पाणी व वीजबिलांच्या दरात आणखी वाढ नको ः लोबो

0
15

राज्यातील पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. या दोन्ही खात्यासाठी गरज भासल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करावी, असे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी विधानसभेत विनियोग विधेयकावरील चर्चेत बोलताना काल सांगितले.

महागाईमुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे. वीज, पाणी बिलाच्या दरात आण़खी वाढ करू नये. युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतीवर आणखीन भर देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यातील खनिज व्यवसाय पाच महिन्यांत सुरू करण्याबाबत दिलेल्या आश्‍वासनाचे पालन करावे. तसेच, म्हादई प्रश्‍नाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे, असेही विरोधी पक्षनेते लोबो यांनी सांगितले.
राज्यातील टॅक्सी चालकांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन करावे. म्हापसा येथे कुजिराच्या धर्तीवर शिक्षण संकुल सुरू करण्याची गरज आहे. बार्देशमधील प्रलंबित रवींद्र भवनाचा प्रश्‍नावर तोडगा काढावा. राजकारण्याच्या विरोधात निवडणुकीत काळात नोंद करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी लोबो यांनी केली.

नगर नियोजन खात्याच्या १६ बी कलमाचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा. टॅक्सी समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढला पाहिजे, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.