Home बातम्या पाठ्यपुस्तकात आंबेडकरांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र

पाठ्यपुस्तकात आंबेडकरांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र

0

संसदेत खडाजंगी

कपिल सिब्बलनी मागितली माफी

दलितांचे कैवारी समजले जाणारे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक आक्षेपार्ह व्यंगचित्र एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात छापल्यावरून काल संसदेत हंगामा झाला. शेवटी मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी सरकारच्यावतीने माफी मागत लवकरच ते व्यंगचित्र पुस्तकातून काढले जाईल अशी ग्वाही दिली.

या आक्षेपार्ह व्यंगचित्रात दाखविले आहे की आंबेडकर गोगलगाईवर बसून संविधान लिहित असून मागून जवाहरलाल नेहरू चाबकाचे फटके लगावत आहेत व संविधानाच्या कामास गती देण्याचा तगादा लावत आहेत. हे व्यंगचित्र १९५० साली शंकर या प्रख्यात व्यंगचित्रकाराने काढले होते ते जशाच्या तसे एनसीईआरटीच्या ११वीच्या राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकात छापून आले आहे.

काल विरोधकांनी सदर व्यंगचित्रावर तीव्र आक्षेप नोंदवत ते अपमानजनक असल्याचे सांगितले त्यावर सिब्बल यांनी सदर प्रकारास आपण वैयक्तिकरित्या दोषी नाही मात्र देशाची माफी मागतो असे सांगितले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाची समिती सध्या पाठ्यपुस्तकांतील आक्षेपार्ह मजकुराचा आढावा घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, कारवाई किती दिवसांत होईल ते निश्‍चितपणे सांगा अशी मागणी करणार्‍या बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांना उत्तर देत सिब्बल म्हणाले की, आंबेडकर कुणा एका समाजाची मालमत्ता नव्हे. ते एक मोठे व्यक्ती होते व त्यांच्यासंबंधी आक्षेपार्ह व्यंगचित्र हटविले जाईल. सदर व्यंगचित्र असलेल्या पाठ्यपुस्तकांचे वितरण तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी सर्व आक्षेपार्ह व्यंगचित्रे पुस्तकांतून काढून टाकली जातील असे ते म्हणाले.

दरम्यान, या विषयावरून काल संसदेचे कामकाज प्रभावित झाले. लोकसभा दुपारी २ नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली तर राज्य सभेत वारंवार गदारोळाची स्थिती निर्माण होत होती.