पाच शहरांचे ओडीपी जनतेच्या सूचनांसाठी होणार खुले : राणे

0
16

राज्यातील पणजी, ताळगाव, म्हापसा, मडगाव आणि फोंडा या शहराचे बाह्य विकास आराखडे (ओडीपी) जनतेच्या सूचना व हरकतींसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगरनियोजनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी नगरनियोजन मंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्यातील पणजी, ताळगाव, म्हापसा, मडगाव आणि फोंडा येथील ओडीपी स्थगित ठेवण्याचा आदेश एप्रिल २०२२ मध्ये जारी करण्यात आला आहे. या ओडीपींमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची सूचना करण्यात आली होती. नव्याने तयार करण्यात आलेले ओडीपी नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. यासंबंधीची सूचना लवकरच जारी केली जाणार आहे. तीन महिन्यांचा कालावधी ओडीपीला अंतिम स्वरूप देण्यासाठी दिला जाणार आहे, असेही राणे म्हणाले.

राज्यातील निवासी विद्यालयांना २० टक्के जादा एफएआर दिला जाणार आहे. तसेच योग संस्थेसाठी जादा एफएआर दिला जाणार आहे. नगरनियोजन मंडळाचा कारभार पारदर्शक ठेवण्यावर भर दिला जात आहे. नगरनियोजन कायद्यात आणखीन दुरुस्ती करण्यावर विचार केला जाणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.