पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका वेळेतच होणार

0
14

>> केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले संकेत

कोरोना व ओमिक्रॉन रुग्ण वाढीच्या पार्श्‍वभूमीवर पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र भारतीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत, असे संकेत काल दिले. निवडणूक होणार्‍या राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्याची सूचना आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. दरम्यान, याबाबत आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय होऊ शकतो.

निवडणूक आयोग निर्धारित वेळापत्रकानुसार विधानसभा निवडणूक घेण्यावर ठाम आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांतील निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण व इतर अधिकार्‍यांबरोबर काल बैठक घेऊन कोरोना आणि ओमिक्रॉन परिस्थितीबाबत चर्चा केली.

देशात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आगामी पाच राज्यांतील निवडणुका पुढे ढकलली जाण्याची शक्यता काही जणांकडून व्यक्त केली जात होती. तथापि, निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता तूर्त फेटाळून लावली आहे.

जाहीर सभांवर येऊ शकते बंदी!
ओमिक्रॉनबाबत केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अहवालानंतर निवडणूक आयोग कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देऊ शकते. तसेच मोठ्या रॅली आणि जाहीर सभांना बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. आभासी पद्धतीने प्रचाराला परवानगी दिली जाईल. तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाच्या अन्य नियमांचे पालन बंधनकारक केले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.