पाच पालिकांची आज मतमोजणी

0
131

>> विजयी उमेदवारांना मिरवणुकीस मनाई

राज्यातील मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या पाच नगरपालिका मंडळासाठी २३ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीतील मतदानातील मतमोजणी आज सोमवार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून संबंधित पालिका क्षेत्रात केली जाणार आहे. राज्यातील कोरोना रूग्णवाढीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीत विजयी उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने मतमोजणी केंद्रावर एसओपीचे योग्य पालन करण्याची सूचना केली आहे.

पाच नगरपालिका निवडणूक रिंगणातील उतरलेल्या ४०२ उमेदवारांचे मतपेट्यांमध्ये सीलबंद झालेले भवितव्य उघडले जाणार आहे. या पाच निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिका निवडणूक पक्षीय पातळीवर घेण्यात आलेली नसली तरी भाजप, कॉँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या निवडणुकीत सक्रीय सहभाग घेऊन आपल्या समर्थकांना निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी एका बैठकीत निवडणूक मतमोजणीचा आढावा घेतला आहे. तसेच, म्हापसा येथील उपजिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक मतमोजणीच्या आयोजनाचा आढावा घेतला आहे. मतदान केंद्राबाहेर पाचपेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र राहू नये. मतमोजणी सभागृहात आणि बाहेर सॅनिटायझर उपलब्ध करावा, थर्मल स्क्रिनिंग करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.