पाच जणांची निर्दोष मुक्तता

0
28

>> पट्टेरी वाघाच्या हत्येप्रकरणी

२००९ मधील पट्टेरी वाघ हत्या प्रकरणातील पाच संशयितांची पुराव्यांअभावी काल न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. २००९ साली पट्टेरी वाघ हत्या प्रकरणाने संपूर्ण सत्तरीला हादरवून सोडले होते. पट्टेरी वाघाच्या हत्येचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी तक्रार नोंद करून गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या गुन्ह्यांतील संशयित गणेश माजिक, नागेश माजिक, सूर्यकांत माजिक, अंकुश माजिक व भिवा गावस हे जामिनावर बाहेर होते; पण काल त्यांची पुराव्यांअभावी प्रथम वर्ग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. २००९ साली केरी-सत्तरी गावातील काही जणांनी रानडुकराची शिकार करण्यासाठी सापळा लावला होता. त्या सापळ्यात हरण सापडले होते. त्या हरणाला खाण्याच्या इराद्याने पट्टेरी वाघाने झडप घातली; पण त्या सापळ्यात पट्टेरी वाघही सापडला व तो १५ दिवस तसाच अडकून राहिला. ज्या लोकांनी सापळा लावला होता, ते जेव्हा त्या जागेवर पोहोचले तेव्हा त्यांना पट्टेरी वाघ दिसला. त्यावेळी त्यांनी वाघाची हत्या करून त्यापैकी काहींनी घटनेचा व्हिडिओ काढला. काही दिवसांनी तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या प्रकरणाला वाचा फुटली. हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर गेल्यावर केंद्रीय वन खात्यामार्फत चौकशी सुरू झाली. त्यानंतर सदर पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेतले होते.