पाच क्लब परवान्याविना

0
142

>> आयएसएलमधील सहभाग अनिश्‍चित

इंडियन सुपर लीगमधील पाच क्लब ओडिशा एफसी, नॉर्थईस्ट युनायटेड एफसी, केरला ब्लास्टर्स, हैदराबाद एफसी व स्पोर्टिंग क्लब ईस्ट बंगाल यांना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने अजून परवाना दिलेला नाही.

आशियाई फुटबॉल कॉन्फडरेशन व राष्ट्रीय परवाना निकष पूर्ण न केल्यामुळे त्यांना परवाने देण्यात आलेले नाहीत. इंडियन सुपर लीगमधील सहभागासाठी त्यांना अपील करावे लागेल किंवा स्पर्धेत सहभागासाठी यातून काही काळ सूट देण्याची विनंती महासंघाला करावी लागणार आहे. एफसी गोवा, एटीके मोहन बागान, बंगळुरू एफसी, जमशेदपूर एफसी, चेन्नईन एफसी व मुंबई सिटी एफसी यांनी २०२०-२१ मोसमासाठी एएफसी व राष्ट्रीय परवाना मिळविला आहे.

परवाना मिळविण्यात अपयश आलेल्या क्लबांना महासंघाच्या क्लब परवाना अपील समितीकडे क्लब परवाना समितीच्या निर्णयाविरुद्ध निर्धारित वेळेत दाद मागावी लागणार आहे किंवा क्लब परवाना समितीकडे सूट देण्याची विनंती करावा लागणार आहे. या दोन्ही पैकी एकही पर्याय न निवडल्यास क्लबला आगामी आयएसएलमध्ये खेळता येणार नाही, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या लीग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनंदो धर यांनी सांगितले आहे. एएफसी परवाना नसलेले क्लब एएफसी चॅम्पियन्स कप किंवा एफसी कप स्पर्धेत खेळण्यास अपात्र ठरणार आहे. आयएसएलद्वारे त्यांना पात्रता मिळविली तरीसुद्धा त्यांना सहभाग नोंदविता येणार नाही.

दरवर्षी एखादा क्लब निकष पूर्ण करण्यात कमी पडतो. परंतु, त्यानंतर त्यांना सूट देण्यात येते. २०२०-२१ राष्ट्रीय व एएफसी क्लब परवान्यासाठी १९ क्लबांनी अर्ज केले होते. यातील ८ क्लब हे आय लीगमधील आहेत. आय लीगमधील क्लबांच्या परवान्यासंबंधी निर्णय अजून झालेला नाही.
कोरोनामुळे एएफसीने परवान्यासाठीची मुदत दोन वेळा वाढवली होती. युवा विकास कार्यक्रम, वैद्यकीय सहाय्य सेवा, ग्रासरुट कार्यक्रम, क्लब युथ अकादमी, युवा प्रशिक्षण कार्यक्रम आदी काही निकषांमध्ये एएफसीने यापूर्वीच सूट दिली आहे.