राज्यातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर करण्यात आला असून मुरगाव, सांगे आणि केपे या तीन पालिकांवर भाजपच्या समर्थकांनी वर्चस्व मिळविले आहे. मडगाव नगरपालिकेवर कॉंग्रेस-गोवा फॉरवर्डच्या आघाडीने बाजी मारली आहे, तर, म्हापसा नगरपालिकेमध्ये भाजप आणि ‘म्हापसेकारांचो एकवट’ ह्या गटाला प्रत्येकी ९ जागा मिळाल्या आहे. तेथे दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. अपक्ष उमेदवार कुणाला पाठिंबा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘म्हापसेकारांचो एकवट’चे सुधीर कांदोळकर यांनी दोन्ही अपक्षांचा आपल्याच गटाला पाठिंबा असल्याचा दावा पत्रकारांशी बोलताना काल केला.
पाच नगरपालिका क्षेत्रांतील ९३ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. भाजप समर्थकांनी ४८ जागांवर विजय मिळविला आहे. केपे नगरपालिकेत भाजप समर्थकांनी ९ जागांवर विजय मिळविला, तर विरोधकांना ४ जागा प्राप्त झाल्या. सांगे पालिकेत भाजप समर्थकांनी ६ जागांवर विजय मिळविला, तर विरोधकांनी ४ जागांवर बाजी मारली. मुरगाव नगरपालिकेत भाजप समर्थकांनी १९ जागांवर विजय मिळविला आहे. दाजी साळकर गटाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
मडगाव पालिकेवर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या समर्थकांनी १९ जागांवर वर्चस्व मिळविले. मडगाव पालिकेत भाजपला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. एका जागेवर अपक्ष विजयी झाला आहे.