अपात्रता निवाड्याची प्रत न दिल्यास न्यायालयात

0
85

>> गिरीश चोडणकर यांचे सभापतींस पत्र

कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांविरुद्ध अपात्रता याचिका मांडलेले प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सभापती राजेश पाटणेकर यांना एक पत्र लिहून वरील याचिकेवर सभापतींनी सहा दिवसांपूर्वी जो निवाडा दिलेला आहे त्या निवाड्याची प्रमाणित केलेली लेखी प्रत आपल्याला विनाविलंब द्यावी, अन्यथा आपण त्यासाठी कोर्टात धाव घेणार असल्याचे कळवले आहे.

२० एप्रिल रोजी आपण अपात्रता याचिकेवर निवाडा दिलात. निवाड्यानंतर आम्ही आम्हाला निवाड्याची प्रमाणित लेखी प्रत द्यावी अशी मागणी केली, त्यावेळी तुम्ही काही चुकांची दुरुस्ती करून लवकरच ही प्रत देण्याचे आश्‍वासन दिले होते. २१ एप्रिल रोजी आपल्या कार्यालयातून एक दूरध्वनी कॉल आला व २२ रोजी सकाळी १०.३० वाजता येऊन सदर प्रत न्या, असे कळवण्यात आले. मात्र, नंतर २२ रोजी कार्यालयातून पुन्हा फोन आला व लेखी प्रत तयार झाली नसल्याचे कळवण्यात आले. ती तयार झाल्यानंतर कळवण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र, २२ एप्रिलनंतर अद्याप तुमच्या कार्यालयातून पुन्हा फोन आला नसून अद्यापही निवाड्याची प्रमाणित केलेली लेखी प्रत देण्यात आली नसल्याचे चोडणकर यांनी पत्रातून सभापतींना कळवले आहे. विनाविलंब आपल्याला ही प्रत देण्यात आली नाही तर आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशाराही चोडणकर यांनी दिला आहे. काल २६ एप्रिल रोजी चोडणकर यांनी सभापती राजेश पाटणेकर यांना हे पत्र लिहिले आहे.