पाक मागतोय काश्मीररुपी भीक

0
152

>> गौतम गंभीरने आफ्रिदीला सुनावले

‘आफ्रिदी, इम्रान, बाजवा यांच्यासारखे जोकर्स फक्त भारत व पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात गरळ ओकून पाकिस्तानच्या जनतेला मूर्ख बनवू शकतात. पण त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत काश्मीर मिळणार नाही. बांगलादेश लक्षात आहे का?’ असे विचारत टीम इंडियाचा माजी सलामीवीर व भाजपचा खासदार गौतम गंभीर याने शाहिद आफ्रिदीची खिल्ली उडवली आहे.

आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध व्हिडिओ जारी करत अपशब्द वापरल्यानंतर गंभीरने आफ्रिदीला आपल्या खास शैलीत सुनावले आहे. देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा झालेला तिळपापड अजूनपर्यंत संपलेला नाही. त्यामुळे काश्मीर मुद्दा उकरून काढण्याची त्यांची जुनी सवय अजूनपर्यंत गेलेली नाही. पाकिस्तानचे आजी-माजी क्रिकेटपटूसुद्धा याला अपवाद नाहीत.

७ लाख सैन्य पाकिस्तानजवळ असून २० कोटी लोक या सैन्याच्या पाठीशी आहेत, तरीही काश्मीरसाठी मागील ७० वर्षांपासून भीक का मागत आहात, असे गंभीरने ‘१६ वर्षीय’ शाहिद आफ्रिदीला विचारले आहे.

तत्पूर्वी, आफ्रिदीने एक व्हिडिओ जारी करताना ‘कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. ते आज त्याच आजारावर सत्ता चालवत आहेत आणि आमच्या काश्मिरी जनतेवर अत्याचार करत आहे, त्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल’, असे म्हटले होते. आफ्रिदीने काश्मीर प्रश्नावरुन संताप व्यक्त करत नरेंद्र मोदींचा सर्वांत डरपोक माणूस म्हणून उल्लेख केला होता. काश्मीरमध्ये भारताचे सात लाख सैनिक मोदींनी तैनात केले आहेत. एवढे सैनिक आमच्या संपूर्ण पाकिस्तानच्या सैन्यात आहेत. परंतु त्यांना हे माहित नाही की, त्या ७ लाख सैनिकांच्या मागे आणखी २२-२३ कोटी सैन्य आहे, असे म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदीच्या फाऊंडेशनला मदत करा असे सांगणारा हरभजन सिंग हा देखील आफ्रिदीवर कमालीचा संतापला आहे. ‘शाहिद आफ्रिदीने त्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. माझ्या देशाबद्दल व पंतप्रधानांबाबत त्याने केलेले वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. त्याने त्याच्या हद्दीत राहावे, त्याला आमच्या देशाबद्दल असे बोलण्याचा हक्क नाही’, असे हरभजन याने त्याला सुनावले आहे.